Video: पुणे-नगर रस्त्याला नदीचे स्वरूप...

Image may contain: outdoor
कोरेगाव भीमा, ता. 23 ऑक्टोबर 2019 : पुणे-नगर रस्त्यावर साचलेले पाणी आणि मोठमोठे खड्ड्यांमुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आले. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. महामार्गावर साचलेले पाणी दुभाजक तोडून भीमा नदीकडे वळविण्यात आले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोरेगाव भीमा येथे सोमवारी (ता. 21) रात्रभर झालेल्या पावसामुळे नगर रस्त्यावर साचलेले पाणी तसेच त्यातील खड्ड्यामुळे मंगळवारी दिवसभर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. छोटी वाहने पाण्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने उलटत होती, तर काही बंद पडत असल्याने चालकांची त्रेधातिरपीट उडत होती. बंद वाहने बाहेर काढण्यासाठी नागरिक व ग्रामपंचायत जेसीबीच्या साह्याने मदत करीत होते. दुपारी बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीने रस्ता व दुभाजक तोडून साचलेले पाणी नदीकडे वळविले.
वाघोली ते कोरेगाव वाहतूक कोंडीमुळे अर्धा तासाच्या अंतरासाठी तीन तास लागले. नगर रस्त्यावरचे पाणी काढून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिस, बांधकाम विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडूनही सुरू होते. मात्र प्रचंड कोंडी व पावसाचे वाढणारे पाणी यामुळे त्यांना मर्यादा येत होत्या. वाहतूक कोंडीमुळे काहींनी पिंपरी सांडसमार्गे नव्या पुलाचा वापर करून पर्यायी मार्ग वापरला.

पुणे-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग, मात्र वाघोली, कोरेगाव भीमामध्ये त्याची अवस्था पावसामुळे शहरातील रस्त्यांसारखी झाली. कधी गुडघाभर पाणी, तर कधी फूटभर खड्डे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला अन्‌ एखाद्या किलोमीटरच्या प्रवासाला लागले चार-पाच तास. हे सर्व थांबणार कधी, याचे उत्तर कोणाकडेच नाही. नागरिक बिचारे हे सर्व मुकाट्याने सहन करतात. संताप होतो मात्र तो काढायचा कुणावर. लोकप्रतिनिधी उड्डाण पूल होणार, कोंडी सुटणार अशी वक्तव्ये सातत्याने करताना दिसतात. मात्र, होणार कधी? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

वाघोली, कोरेगाव भीमा व शिक्रापूर या ठिकाणी या समस्या उद्‌भवून कोंडी होते. यातून कायमस्वरूपी मार्ग काढणे अवघड नाही. मात्र मागील सरकारने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी चार वेळा बदल करत वेगवेगळा निधी जाहीर करण्यापलीकडे काही केलेले नाही. शिरूरपर्यंत 100 किलोमीटर रस्त्याची खरी समस्या आहे. वाघोलीपासून पाच ते सहा उड्डाणपूल व आठ पदरी रुंदीकरण केल्यास, ही समस्या सुटू शकते. आता येणारे लोकप्रतिनिधी व नवीन सरकारतरी याकडे गांभीर्याने बघतील, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.

काय घडले पुणे नगर महामार्गावर...
- उबाळेनगर व कावेरी हॉटेल परिसरात महामार्गावर गुडघाभर पाणी
- वाघोली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी
- दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
- विद्यार्थी, नोकरदारवर्गाचे प्रचंड हाल
- जेसीबीच्या साह्याने पाणी काढून देण्याची पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची कसरत
- अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण, सर्वत्र दलदल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या