शिरूर विधानसभेच्या आठ उमेदवारांचे 'डिपॉजीट' जप्त

Image may contain: sky and outdoorशिरूर, ता. 26 ऑक्टोबर 2019: शिरूर विधानसभेची निवडणूक लढविणाऱया आठ उमेदवारांचे डिपॉजीट (अनामत रक्कम) जप्त झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक पवार व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाबूराव पाचर्णे वगळता वंचित विकास आघाडी व मनसेसह उर्वरित सर्व आठ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे पवार व पाचर्णे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतच सरळ लढत झाल्याचे स्पष्ट झाले.

शिरूर विधानसभेसाठी एकूण दोन लाख 27 हजार 259 मतदारांनी मतदान केले. यापैकी एक लाख 44 हजार 293 मते मिळवून ऍड. पवार विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी पाचर्णे यांना एक लाख तीन हजार 89 मते मिळाली. विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या किमान सहा टक्के मते मिळवणाराची अनामत रक्कम वाचते. या निकषात केवळ पाचर्णे यांची मते येतात.

वंचित विकास आघाडीचे चंदन किसन सोंडेकर यांना तीन हजार 134 मते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कैलास संभाजी नरके यांना एक हजार 922, बहुजन समाज पक्षाचे रघुनाथ महिपती भवर यांना 906, बहुजन मुक्ती पार्टीचे अमोल गोरख लोंढे यांना 741 मते मिळाली. अपक्ष रिंगणात उतरलेल्या डॉ. नितीन आबा पवार यांना 332 मते, सुधीर रामलाल पुंगलिया 235 व चंद्रशेखर ज्ञानेश्‍वर घाडगे यांना केवळ 177 मते मिळाली. विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतसंख्येच्या सहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी मते मिळाल्याने या सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली.

शिरूर तालुक्‍यातून पवार यांना जवळपास वीस हजार; तर हवेली तालुक्‍यातून 21 हजारांच्या वर मतांची आघाडी मिळाली. दोन्ही तालुक्‍यांत मिळून त्यांना 41 हजार 504 मतांची आघाडी मिळाली. हे मताधिक्‍य आतापर्यंतचे "रेकॉर्डब्रेक' असून, यापूर्वी सूर्यकांत पलांडे यांच्या नावावर मताधिक्‍क्‍याचा विक्रम होता. 1980 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 24 हजार 651 मतांनी विजय मिळवला होता. ऍड. पवार यांनी सुमारे अडीच लाख मतांतून 41 हजारांचे मताधिक्‍क्‍य मिळवले; परंतु पलांडे यांच्या निवडणुकीत केवळ 89 हजार मतदान होऊन त्यातून त्यांनी एकतर्फी मते मिळवली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या