दिवाळीसाठी दुचाकीवरून निघाले होते गावाला पण....

शिरूर, ता. 27 ऑक्टोबर 2019: दिवाळीसाठी गावी निघालेल्या दोन युवकांवर शिरूरजवळ काळाने घाला घातला. दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघात शनिवारी (ता.26) पहाटे साडेतीनच्या सुमारास झाला.

पुणे-नगर रस्त्यावरील कारेगाव (ता. शिरूर) हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत आसाराम बाबासाहेब दराडे (वय 26, रा. पांगरी, ता. आष्टी, जि. बीड) व महेश प्रकाश गिते (वय 21, रा. धाड बुद्रुक, ता. संगमनेर, जि. नगर) हे दोघे युवक ठार झाले. नानासाहेब तबाजी पोटे (रा. फलकेमळा, कारेगाव) या रुग्णवाहिकेच्या चालकाने याबाबत कळविल्यानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आसाराम दराडे व महेश गिते हे पुण्यात कामाला होते. दीपावलीसाठी शुक्रवारपासून सुटी मिळाल्याने दिवाळी साजरी करण्यासाठी ते मोटारसायकलवरून (एमएच 16; एजी 9321) पुणे-नगर रस्त्याने मूळ गावी निघाले होते. कारेगावजवळील अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पोटे यांच्याशी संपर्क साधला. पोटे रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा दराडे याचा जागीच मृत्यू झाला होता. गिते याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेताना त्याचाही वाटेतच मृत्यू झाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या