...तर गावपुढाऱ्यांवर देखील कारवाई होणार का?

केंदूर, ता. 27 ऑक्टोबर 2019 (विशाल वर्पे): केंदूर (ता. शिरूर) येथील थिटेवाडी हद्दीत वेळ नदीतून वाळू चोरी केल्या प्रकरणी वाळू चोरांवर कडक कारवाई करावी म्हणून केंदूरचे माजी उपसरपंच गोविंद साकोरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उपोषण सुरू केले होते. मात्र, तहसीलदार एल. डी. शेख यांच्या तोंडी आश्वासनानंतर साकोरे यांनी तात्पुरते उपोषण स्थगित केले आहे.

केंदूरच्या थिटेवाडी हद्दीतून गेल्या अनेक दिवसांपासून वाळू चोरी सुरू होती. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते. केंदूरचे माजी उपसरपंच गोविंद साकोरे आणि अभिजित साकोरे यांनी अनेकदा तलाठी आणि तहसील कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, महसूल विभाग निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असल्याने निवडणूक झाल्यानंतर पाहू, हे प्रकरण शिक्रापूर पोलिसांनकडे पाठवू अशी मोघम उत्तरे मिळू लागल्याने माजी उपसरपंच अभिजित साकोरे आणि गोविंद साकोरे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात बेमुदत उपोषण सुरू करण्याचा अर्ज सादर केला होता. त्यानंतर दोन दिवसांपासून सुरू केलेले उपोषण जोपर्यंत वाळू चोरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही.

दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला असल्याचे साकोरे यांनी सांगितले. महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेतली नव्हती. ऐन सणासुदीच्या दिवसांत उपोषण सुरू असल्याने दत्तामामा थिटे, प्रमोद पऱ्हाड, अंकुश पऱ्हाड यांनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तलाठी, तहसीलदार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणाचा आपण पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार एल. डी. शेख यांनी उपोषणकर्ते साकोरे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. दिवाळी संपताच वाळू चोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर अखेर साकोरे यांनी तात्पुरते उपोषण मागे घेतले आहे. या वाळू चोरी प्रकरणी काही गावपुढाऱ्यांचा देखील सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे, अशा गावपुढाऱ्यांवर देखील कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या