चासकमानच्या अतिरिक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

No photo description available.
शिक्रापूर,ता. २९ ऑक्टोबर २०१९ (विशाल वर्पे) : चासकमानच्या कालव्यातून सुरू असलेल्या पाण्यामुळे कालव्यालागतच्या शेतकऱ्यांच्या शेतात उपळीचे पाणी साचल्याने पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. दोन महिन्यांपासून चासकमानच्या डाव्या कालव्यातून तब्बल पाचशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर पावसाचे प्रमाणही यावर्षी अधिक असल्यामुळे कालव्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांचा पिकामध्ये पाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 कालव्याच्या बाजूच्या शेतात ऊस आणि कांदा ही दोन पिकं प्रामुख्याने घेतली जातात मात्र पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी कालव्याचे पाणी कमी करून पर्यायी मार्गाने नदीत सोडण्याची मागणी करत आहेत त्याचबरोबर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत.
 
कालव्याच्या बाजूच्या गावांना करंदी, पिंपळे जगताप, वाजेवाडी, जातेगाव खु, मुखई या गावातील तब्बल दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरातील अंदाजे एक हजार पाचशे हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त उसाच्या पिकाला फटका बसला आहे त्याचबरोबर तरकारी पिकांना देखील याचा फटका बसल्याने महसूल प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत. दिवसेंदिवस नापिकीचे प्रमाण वाढत असताना त्यात वेळप्रसंगी गरज असताना न मिळणारे चासकमानचे पाणी गेली दोन महिन्यांपासून सुरू आहे ते पाणी पर्यायी मार्गाने नदीला सोडावे ही मागणी जोर धरू लागली आहे.

त्याचबरोबरोबर केंदूरच्या पऱ्हाडवाडी भागात देखील पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शेतजमीनी पाझरून त्याठिकाणी देखील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. याबाबत क्रांती युवा संघटनचे अध्यक्ष विकास दरेकर म्हणाले, पाण्याचा विसर्ग कमी करून पर्यायी मार्गाने अतिरिक्त पाणी नदीत सोडायला पाहिजे त्याचप्रमाणे पाझरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या