सहा महिन्यांपासून गायब व्यक्तीचा आढळला मृतदेह...

शिक्रापूर, ता. 13 नोव्हेंबर 2019: करंदी येथील एका व्यक्तीचा मृतदेह गावाजवळील जंगलात सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृताच्या खिशातील आधारकार्डासह इतर दस्तऐवजांमुळे सदर व्यक्तीची ओळख पटली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंदी (ता.शिरूर) येथील बाळासाहेब ज्ञानोबा ढोकले (वय 58) हे सहा महिन्यांपासून अचानक राहत्या घरातून गायब झाले. कुटुंबियांनी ते बाहेरगावी गेले असतील म्हणून दुर्लक्ष केले होते. पण, मंगळवारी (ता 12) सकाळी साडेआठच्या सुमारास गावातीलच महेश कोंडीबा साबळे (रा. करंदी) यांना गावाजवळील पिंपळदरा या जंगलात मानवी कवटी, हाडे आणि कपडे अस्ताव्यस्त पडलेल्याचे दिसले. याबाबतची माहिती त्यांनी शिक्रापूर पोलिसांना दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी पोलिस पथकासह पाहणी केली. यावेळी विषारी औषधाची बाटली, काही कपडे, कपड्यांमध्ये मृत ढोकले यांचे आधारकार्ड व काही कागदपत्रे आढळून आले. पोलिसांनी ढोकले परिवाराला बोलावून घेतले. मात्र मृतदेहाची ओळख पटावे असे काहीच दिसत नसल्याने ढोकले परिवाराने हा मृतदेह बाळासाहेब ढोकले यांचा नसल्याचे सांगितल्याने सांगितले. काही वेळाने सोबतची कागदपत्रे, गायब होण्याचा कालावधी, अस्ताव्यस्त पडलेल्या इतर वस्तुंची पाहणी केली असता सदर मृतदेह बाळासाहेब ढोकले यांचा असल्याचे निष्पन्न झाले.


दरम्यान, सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून, पुढील तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या