कान्हूरचे सरपंच व ग्रामसेवकावर लाचप्रकरणी गुन्हा दाखल

शिक्रापूर, ता. 15 नोव्हेंबर 2019 : ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये केलेल्या जलवाहिनीच्या कामाचे बील काढण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्यासह लाच घेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या सरपंचाविरुद्धही शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शिरुर येथील कान्हुर मेसाई ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात आली.

गंगाराम सदाशिव शेलार (वय 49, ग्रामसेवक कान्हूर मेसाई, शिरुर) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. अनिल गोपाजी गोरडे (वय 41, रा. कान्हूर मेसाई, शिरुर) असे गुन्हा दाखल झालेल्या सरपंचाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने कान्हूर मेसाई गावात तातडीने जलवाहिनी टाकण्याचे काम केले होते. या कामाचे बील काढण्यासाठी ग्रामसेवक शेलार व सरपंच गोरडे यांनी तक्रारदाराकडे 70 हजार रुपयांची मागणी केली होती.

तडजोडीअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकाराबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सापळा रचून तक्रारदारास 40 हजाराची लाच स्विकारताना ताब्यात घेतले. ग्रामसेवकाला लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी सरपंच गोरडे विरुद्धही शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या