Video: इनामगावमध्ये बिबट्या घरातच शिरला अन्...

मांडवगण फराटा, ता.१६ नोव्हेंबर २०१९ (प्रतिनिधी):  इनामगाव (ता.शिरुर) येथे शनिवार (ता. १६) रोजी दुपारी बिबट्याने घरामध्ये शिरुन केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला हिराबाई बबन खळदकर (वय ७० रा. वाळुंजपट इनामगाव) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या हल्ल्यानंतर बिबट्याला बाहेर जाण्यास मार्ग न सापडल्याने बिबट्या त्याच घरात दबा धरुन बसल्याने घराच्या आसपास नागरिकांनी सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इनामगाव येथील वाळुंज पट या भागात शनिवारी अंगणात लहान मुले खेळत होती. इतक्यात कुत्र्याला बिबट्याची चाहूल लागली. बिबट्याला पाहताच अंगणातील लहान मुले घाबरून घरात पळाली. यावेळी बिबट्या हा अंगणात आला.हिराबाई खळदकर या आजी नुकत्याच आतील खोलीतून बाहेर येत होत्या. यावेळी काही कळण्याच्या आतचं बिबट्याने आजींवर हल्ला चढविला.
या  हल्ल्यात खळदकर यांना डाव्या हाताला, अंगाला गंभीर दुखापत झाली आहे. हि घटना घडत असताना शेजारील महिलांनी पाहिल्याने त्यांनी मदतीसाठी मोठयाने आरडाओरडा केला. यावेळी जवळच असणा-या अतुल रावसाहेब मचाले यांनी अचानक झालेला आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेतली आणि  बिबट्याला हुसकावुन लावले. त्यानंतर तत्परतेने मांडवगण येथील खासगी दवाखान्यात उपचारांसाठी नेले. मांडवगण फराटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हिराबाई खळदकर यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी (ता. १५) इनामगाव येथील घटनास्थळी बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून पाळीव कुत्रे उचलून नेले होते व त्यामुळे बिबट्या शनिवारी पुन्हा भक्ष्याच्या शोधात आला असल्याचे इनामगाव येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. शिरूरच्या  पूर्व भागातील मांडवगण फराटा, तांदळी, इनामगाव, गणेगाव दुमाला, वडगाव रासाई, रांजणगाव सांडस आदी भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. यावेळी मनोहर म्हसेकर (वनपरिक्षेञ अधिकारी), बी.एस शिंदे वनरक्षक, श्रीमती ए एस होले, एन डी गांधले वनसेवक, एस जी पावणे सर्व सेस्क्यु टीम शिरूर घटनस्थळी पोहोचले होते. परंतु, यावेळी बिबट्या सर्वांना  हुलकावणी देऊन पळून गेला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या