तुमच्या घरातील खासगी आयुष्य मी शूट केलेय...

शिक्रापूर, ता. 21 नोव्हेंबर 2019: तुमच्या घरातील खासगी आयुष्य मी शूट केले असून ते उघड करीन, तुम्ही तुमच्या बिल्डींगच्या वरच्या मजल्यावर एक लाख रुपये आणून ठेवा', अशा धमकीचे लेखी पत्र ठेवले. पण, पोलिसांच्या जाळ्यात अखेर तो सापडलाच.

एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने फी भरण्यासाठी हा प्रकार केल्याचे तपासात उघड झाले आहे. या विद्यार्थ्याने एका दांपत्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली. शिवाय, घरात गुपचूप सीसीटिव्ही कॅमेरा लावून घरातील शुटींग उघड करण्याची धमकी दिली होती.

शिक्रापूरमधील एका सोसायटीतील एका दांपत्याला त्यांच्या घराच्या खिडकीत एक सीसीटीव्ही लावल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबतची माहिती शिक्रापूर पोलिसांना दिली. पुढील, दोनच दिवसांमध्ये या दांपत्याच्या दुचाकीवर "तुमच्या घरातील खासगी आयुष्य मी शूट केले असून ते उघड करीन. तुम्ही तुमच्या बिल्डींगच्या वरच्या मजल्यावर एक लाख रुपये आणून ठेवा', अशा धमकीचे लेखी पत्र आढळून आले.

याबाबतची माहिती पोलिसांना कळताच फौजदार राजेश माळी, पोलिस नाईक व्ही. एस. आंबेकर यांनी दोन दिवसांपूर्वी पैशांचे पुडके ठेवून रात्रभर बंदोबस्त ठेवला. मात्र, कुणीच आढळले नाही. अखेर काही संशयितांना ताब्यात घेताच त्यातील आकाश भीमसेन काळे या युवकाला पोलिसी खाक्‍या दाखवला. यानंतर त्याने वरील प्रकाराची कबुली दिली. काळे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार केवळ महाविद्यालयाच्या एक लाख फीसाठी केल्याचेही त्यांनी पोलिस तपासांना चौकशीदरम्यान सांगितले. शिक्रापूर पोलिसांनी शिरूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या