केंदूरचा शेतकरी सुनिल सुक्रे सोशल मीडियावर हिट...

Image may contain: 3 people, people smiling, people standingशिरूर, ता. 23 नोव्हेंबर 2019: शिरूर तालुक्यातील केंदूर येथील शेतकरी सुनील सुक्रे यांनी केंदूर ते मुंबई असा मोटरसायकलने प्रवास करत आपल्या शेतातील भाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर नेऊन दिली. शरद पवार यांनी सुक्रे यांच्यासोबत छायाचित्र काढून ट्विट केल्यानंतर ते सोशल मीडियावर हिट झाले.

सुक्रे यांन केंदूरवरून दुचाकीने प्रवास करून पवार यांच्या घरी शुक्रवारी (ता. २२) भाजीपाला पोहोचता केला. या घटनेबाबत पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर केलेल्या पोस्टमध्ये 'सुनील सुक्रे या शिरूर तालुक्यातील केंदूर गावच्या शेतकऱ्याने २०० किलोमीटर दुचाकीने प्रवास करून मला मुंबईत भाजीपाला आणून दिला. अशा काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रेम हीच माझी शक्ती आहे,' असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर सुक्रे यांचे छायाचित्र व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. याबाबत सुक्रे म्हणाले, 'शरद पवार हे आम्हा शेतकऱ्यांचे आधारवड आहेत. त्यांचे शेतकऱ्यांवर अनंत उपकार आहेत. शेतकरी सुखी ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. शेतकऱ्यांवर कसलीही वेळ आली, तर ते आधार द्यायला येतात. अशा नेत्याला माझ्या शेतातील भाजी द्यावी अशी इच्छा होती. मी सकाळी पहाटे गावातून मुंबईला गेलो. साहेबांना भाजी पोहोच केल्यावर मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या