पुणे-नगर रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले अन्...

Image may contain: 1 person, standing and outdoor
सणसवाडी, ता. 28 नोव्हेंबर 2019: पिकअप टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो दुभाजक ओलांडून कामगारांच्या बसवर जाऊन जोरात धडकला. या अपघातात पिकअप चालकाचा मृत्यू झाला असून, बसमधील 8 कामगारांना किरकोळ जखमी झाले आहेत.

पुणे-नगर रस्त्यावर सणसवाडी येथे बुधवारी (ता. 27) सकाळी ही घटना घडली. मच्छिंद्र यादव येवले (रा. पेरणेफाटा, ता. हवेली) असे अपघातात मरण पावलेल्या चालकाचे नाव आहे. अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. जखमींना बाहेर काढले. यावेळी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, काही वेळानंतर सुरळीत झाली. पेरणे फाटा येथे व्यवसायिक म्हणून परिचित असलेले मच्छिंद्र येवले यांच्या अपघाती निधनाने परिसरावर शोककळा पसरली. दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथे निसर्ग हॉटेलजवळ बुधवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास बसचालक पोपट रावसाहेब पवार (वय 43, रा. दिघी, ता. हवेली) हे 38 कामगारांना घेऊन रांजणगावला एलजी कंपनीत निघाले होते. नगर रस्त्यावरून विरुद्ध दिशेने भरधाव आलेला पिकअप टेम्पो दुभाजक ओलांडून बसवर समोरून जोरात आदळला. यावेळी झालेल्या अपघातात पिकअप चालकाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या दुभाजकाची उंची अनेक ठिकाणी अत्यंत कमी असल्याने वेगात असलेले वाहन सहज दुसऱ्या बाजूला जाते. अशाच एका अपघातात महिन्यापूर्वी वाघोलीत एका तरुणाला जीव गमवावा लागला; तर तिघे गंभीर जखमी झाले. बुधवारी पुन्हा एक जण मृत्युमुखी पडला. दुभाजकाची उंची वाढवल्यास अशा प्रकारचे अपघात टळू शकतात, असे नागरिकांनी सांगितले. म्हणणे आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या