शिरूर तालुक्यातही 'ड्रोन'द्वारे होणार गावठाण मोजणी...

Image may contain: one or more people, outdoor and nature
शिरूर ता. 6 डिसेंबर 2019: पारदर्शकता, सुलभता, तरलता व अचूकता या बाबी समोर ठेवून ग्रामीण भागातील गावठाण मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा कार्यक्रम "भूमी अभिलेख'ने हाती घेतला असून, राज्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पुणे जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. पुरंदर, दौंड व हवेली तालुक्‍यांपाठोपाठ आता पहिल्याच टप्प्यात शिरूर तालुक्‍यातील गावठाण मोजणीही लवकरच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे होणार आहे, अशी माहिती "भूमी अभिलेख'चे पुणे विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी दिली.

पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा कमी वेळेत, कमी श्रमात व कमी मनुष्यबळाचा वापर करून मोजणी कामात पारदर्शकता व अचूकता आणण्यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला आहे. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गावठाण मोजणीतून, संबंधित गावे व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्तांची अचूक मोजणी करता येईल. त्यातून ग्रामपंचायत महसुलात वाढ होणार असल्याचे, तवरेज यांनी सांगितले.

या प्रक्रियेमुळे ग्रामपंचायतींकडील मालमत्ता कर निर्धारण पत्रक, आठ अ नोंदवही आपोआप तयार होऊन कर आकारणी आपसूकच अद्ययावत होणार आहे. गावठाण हद्दीतील प्रत्येक मिळकतीच्या सीमा निश्‍चित होतील. गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे नेमके क्षेत्र यामुळे माहिती होईल. गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे; तसेच मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक तयार होईल. ग्रामस्थांचे, नागरी हक्कांचे यामुळे संरक्षण होईल. गावातील रस्ते, शासनाच्या; तसेच ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले, ओढे यांच्या सीमा निश्‍चित होऊन अतिक्रमण रोखता येईल, अशी माहिती तवरेज यांनी दिली.

बांधकाम परवानगीसाठी आवश्‍यक असलेली मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावेल. ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. मालकी हक्क व हद्दीबाबतचे वाद मिटतील. गावठाणातील सार्वजनिक जागा, बखळ जागा, रस्ते, नाले यांचे नकाशे अभिलेख तयार होणार असल्याने सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण होण्यास मदत होईल. गावठाणातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे संरक्षण होऊन गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार होणार आहे, असे तवरेज यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या