शिक्रापूर पोलिसांनी 'पुणे'ला दिला न्याय पण...

Image may contain: outdoor
शिक्रापूर, ता. 7 डिसेंबर 2019: 'उच्चार करून दाखवा...', "वाचून दाखवा आणि एक लाख ते एक कोटीचे बक्षीस मिळवा' या सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजची शिक्रापूर पोलिसांनी दखल घेतली पण पुन्हा एक चुक केली.

शिक्रापूर पोलिसांकडून पुणे-नगर महामार्गावर रस्ता दुभाजकासाठी काही फलक लावलेले आहेत. त्यातील एका फलकावर "शिक्रापूर पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण' हे लिहिताना "पुणे' हा शब्द "पणुे' असा लिहिला गेला होता. ते वाचणे एकाही मराठी माणसालाच सोडा मराठी भाषा तज्ज्ञालाही शक्‍य झाले नसते. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते.
मजकूर वाचून दाखविणाऱ्यांना एक लाख ते एक कोटीपर्यंतच्या बक्षिसांची खैरातही झाली. आता हा मजेशीर फलक आणि त्यावर शिक्रापूर पोलिसांचा उल्लेख झाल्याने शिक्रापूर पोलिसांनी तातडीने दखल घेतली आणि हा फलक महामार्गावरील तब्बल 150 फलकांमधून शोधून काढला. हा फलक सापडला तो कोरेगाव भीमा येथील गणेश भुवन हॉटेल चौकात आणि फलकावरील पुण्याचा "पु'मधला उकार नेमका जागेवर म्हणजेच "प'खाली आणून हा फलक पुन्हा रात्रीत जागेवर बसविला. एखाद्या पेंटरकडून चूक झाल्यावर ते किती व्हायरल होऊ शकते याचा मजेशीर अनुभव शिक्रापूर पोलिसांना आला.

शिरूर तालुक्यातील www.shirurtaluka.comने संबंधित छायाचित्र फेसबुकवरून व्हायरल करत पोलिसांना ट्विट केले होते. अखेर या फलकाची दखल घेतली गेली. पण, एक चुक तशीच राहिली. 'शिक्रापुर' या शब्दामधील 'पू' हा दीर्घ असायला हवा होता. 'शिक्रापुर' नव्हे तर 'शिक्रापूर' असे हवे होते. एक चुक सुधारली तर दुसरी तशीच राहिली. शिक्रापूर पोलिसांनी 'पुणे'ला न्याय दिला पण 'शिक्रापूर'ला कधी देणार, अशा प्रतिक्रया सोशल मीडियावर नोंदविल्या जात आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या