घरात जाऊन पाहिले तर निपचित पडल्या होत्या...

शिरूर, ता. 9 डिसेंबर 2019: शिरूर शहरातील लाटेआळी परिसरात शनिवारी (ता. 7) रात्री दारूच्या नशेत मुलाने केलेल्या मारहाणीत आईचा मृत्यू झाला. या प्रकरणी नशेखोर मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुमित्रा मारुती शिंदे (वय 65) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांना मंगेश मारुती शिंदे यांनी मारहाण केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुमित्रा व त्यांचा मुलगा मंगेश यांच्यात गेल्या आठ दिवसांपासून भांडण सुरू होते. मंगेशची पत्नीही त्याच्या सततच्या मारहाणीला कंटाळून काही दिवसांपासून माहेरी गेली होती. त्यामुळे मायलेकच राहत होते. शनिवारी रात्री त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. भांडणात डोक्‍याला मार लागल्याने सुमित्रा यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मंगेश घरातून निघून गेला.

सुमित्रा शिंदे यांच्या घराशेजारी त्यांचे चुलत भाऊ संजय जाधव हे राहतात. त्यांनी अकराच्या सुमारास घरात जाऊन पाहिले असता त्या निपचित पडल्या होत्या. त्यांनीच याबाबत पोलिसांना कळविले. डोक्‍यात कठीण वस्तूचा मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे फौजदार गणेश जगदाळे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या