रांजणगावमधील कंटेनर लुटणारी टोळी जेरबंद...

Image may contain: one or more people, people standing and outdoorशिरूर, ता. 10 डिसेंबर 2019: रांजणगाव (ता. शिरूर) येथील हायर कंपनीचे एलईडी टीव्ही, वॉशिंग मशिन घेऊन भिवंडी, मुंबई येथे जाणारा कंटेनर अडवून चालकाला मारहाण केली. माल चोरून चाकणजवळील राक्षेवाडीच्या हद्दीत लपवून ठेवला. याप्रकरणी चालकाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी नऊ जणांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांतील 46 लाख 75 हजार रुपयांचा माल जप्त केला. एक आरोपी फरारी आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली.

हा प्रकार 27 नोव्हेंबर रोजी घडला होता. याप्रकरणी माधव रोहिदास गिते (वय 22, रा. मेदनकरवाडी, ता. खेड), मंगेश काकासाहेब शिंदे (वय 26, रा. खडकी जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), प्रदीप ऊर्फ ज्योतिराम जालिंदर देशमुख (वय 30, रा. सोलापूर), गणेश शांताराम राक्षे (वय 30, रा. राक्षेवाडी, चाकण, ता. खेड), जयराम रामनाथ तनपुरे (रा. राहुरी, जि. नगर), कृष्णा ऊर्फ राहुल एकनाथ धनवटे (रा. राहुरी, जि. नगर), संदीप ऊर्फ अण्णा रावसाहेब धनवटे (वय 43, रा. राहुरी, जि. नगर), राजेश महादेव बटुळे (वय 34, रा. निघोजे, ता. खेड), प्रवीण शंकर पवळे (वय 23, रा. राक्षेवाडी) यांना अटक केली आहे. बबुशा नाणेकर (रा. नाणेकरवाडी, ता. खेड) हा फरारी आहे.

यातील राजेश बटुळे याने त्याचे साथीदार विशाल भोसले, नितीन भोसले, अजय भोसले यांच्या मदतीने कुरुळी येथून चार लाख रुपये किमतीचे टायर चोरून नेले होते. त्याबाबत महाळुंगे पोलिस चौकी, चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ते टायर जप्त करण्यात आले आहेत.

सुदुंबरे (ता. मावळ) येथील महिंद्रा कंपनीच्या आवारातून एक लाख 80 हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरून नेल्या होत्या. त्याबाबत तळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्या बॅटऱ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. पाईट येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शटर फोडून रोख रक्कम चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींनी इतर तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक पवार, साहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलिस हवालदार सुरेश हिंगे, संजय जरे, वीरसेन गायकवाड, हनुमंत कांबळे, संदीप सोनवणे, निखिल वर्पे, प्रदीप राळे, नितीन गुंजाळ, अशोक दिवटे, मनोज साबळे, मच्छिंद्र भांबुरे यांनी केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या