'आई, मी चालले, बाय बाय...' असे म्हणत आत्महत्या

Image may contain: 1 person, smiling, sittingशिरूर, ता. 22 डिसेंबर 2019 : मानलेल्या आईला मोबाईलवरून 'आई, मी चालले, बाय बाय...' असे म्हणत विवाहित युवतीने आत्महत्या केल्याची घटना शिरूरमध्ये घडली आहे. प्राची गणेश ओहोळ (वय 21, रा. बागवान नगर, शिरूर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. त्या येथील एका खासगी रूग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होत्या.

प्राची यांचे पती गणेश लालासाहेब ओहोळ यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. शुक्रवारी (ता. 20) रात्री घडलेल्या या प्रकाराची सुरवातीला "अकस्मात मृत्यु' म्हणून नोंद करण्यात आली होती. परंतु, शिरूर पोलिसांनी संबंधितांचे जबाब नोंदविल्यानंतर आज आत्महत्येची नोंद केली. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, प्राची ओहोळ या येथील डॉ. मनिषा चोरे यांच्या दवाखान्यात गेल्या तीन वर्षांपासून परिचारिका म्हणून काम करत होत्या. त्यांनी डॉ. चोरे यांना आई मानले होते. डॉ. चोरे यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करत असलेल्या गणेश ओहोळ यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. शिवाय, डॉ. चोरे यांच्याशी बोलताना सातत्याने आत्महत्येचा विचार डोक्‍यात घोळत असल्याचे सांगत होत्या. डॉ. चोरे यांनी त्यांना समजावून सांगितले होते.

दरम्यान, शुक्रवारी (ता. 20) त्या कामावर न आल्याने डॉ. चोरे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून दवाखान्यात बोलावून घेतले. दवाखान्यात काही वेळ थांबून सर्वांशी हसून, बोलून "आता निरोप घेते' असे म्हणून त्या निघून गेल्या. डॉ चोरे यांनी त्यांची बरीच समजूत काढली व थांबायला लावले, परंतु काही वेळाने त्या घरी गेल्या. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांनी डॉ. चोरे यांच्या मोबाईलवर संपर्क साधून "आई, मी चालले, बाय बाय' असे म्हणत फोन कट केला. डॉ. चोरे यांना संशय आल्याने त्या गणेश ओहोळ यांना घेऊन तातडीने प्राची राहात असलेल्या बागवान नगर मधील घरी गेल्या. त्यावेळी प्राची यांनी बेडशीटने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोघांनी तातडीने त्यांना खाली घेऊन खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथे नेत असताना रात्री नऊच्या सुमारास त्यांचा वाटेतच मृत्यु झाला.

दरम्यान, विमनस्क अवस्थेमुळे प्राची ओहोळ यांनी गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. कौटुंबिक कलहातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास पोलिस नाईक उमेश भगत करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या