शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची कंटाळून आत्महत्या

Image may contain: 1 person, night and closeupशिरूर, ता. 3 जानेवारी 2020 : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील शेतकरी एकनाथ हरिभाऊ शेटे (वय 55) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून घराशेजारील कांदाचाळीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

एकनाथ शेटे यांची गावामध्ये बागायती शेती आहे. त्यामध्ये यंदा त्यांनी डाळिंब व कांदा पिकाचे उत्पादन घेतले होते. त्यासाठी त्यांनी बॅंकेकडून कर्ज काढले होते. मात्र, गेल्या महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंब बागेचा बहर गळून पडला. त्यामुळे नुकसान झाले. गतवर्षी कांद्याला भाव मिळाला नाही. त्या वेळेपासूनच कर्ज थकले होते. कर्जवसुलीसाठी बॅंकेकडून नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, पीक वाया गेल्यामुळे उत्पन्न मिळणार नव्हतेच. यामुळे एकनाथ शेटे यांचा मानसिक ताण वाढला होता. कुटुंबीय व नातेवाइकांमध्ये त्यांनी ही चिंता व्यक्त केली होती.

दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत शिरूर तालुक्‍यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने कर्जाचा बोजा वाढत चालला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या