शिरूर परिसरात टेम्पोची झडती घेतली अन्...

Image may contain: 3 people, outdoorशिरूर, ता. 6 जानेवारी 2020: स्पिरिटचा (मद्यार्क) काळाबाजार करणारी टोळी जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून चार वाहनांसह 75 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. स्पिरीटचा वापर करून अवैधरित्या देशी दारू तयार करणाऱ्या या टोळीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून ताब्यात घेतले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिरूर परिसरातून अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोची झडती घेतली. त्यावेळी टेम्पोतून स्पिरिटची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आले. टेम्पोतील हनुमंत जोगदंड, कृष्णा जोगदंड आणि वासुदेव जोगदंड (रा. बीड) या तीन संशयितांकडे चौकशी केली. या चौकशीत त्यांनी हे स्पिरीट औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर-आंबेवाडी रस्ता येथील एका टँकरमधून आणल्याची माहिती दिली. त्यावरून राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक संतोष झगडे यांच्या सूचनेनुसार भरारी पथकाने औरंगाबाद जिल्ह्यात संबंधित टँकर चालकासह मालकाची चौकशी केली.

चौकशीदरम्यान त्यांनी बार्शी येथे अवैधरित्या देशी दारूचे उत्पादन घेण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने नारी माळेगाव (ता. बार्शी) येथे छापा टाकून देशी दारू तयार करणाऱ्या टोळीला जेरबंद केले. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून स्पिरिटचे ड्रम, मशीन आणि देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपींना शिरूर येथील न्यायालयात हजर केले असता, संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या