वाघोलीमधील वाहतूक कोंडी सुटणार; शिक्रापूरचे काय?

शिरूर, ता. 6 जानेवारी 2020: वाघोली-पुणे-नगर महामार्गाला पर्यायी रस्ता असणाऱ्या खांदवेनगर जकात नाका ते कटकेवाडी येथील आरपी रोडपैकी जकातनाका ते आव्हाळवाडी रस्त्यापर्यंत 4.5 किलोमीटरच्या कामास पीएमआरडीएने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यामुळे वाघोतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असला तरी शिक्रापूरमधील वाहतूक कोंडी सुटणेही गरजेचे आहे.

वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामार्गाची पाहणी व बैठका घेऊन आमदार अशोक पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशानंतर आरपी रोड करण्यास पीएमआरडीएने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. वाघोली येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामध्ये बैठका व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनेकवेळा पुणे-नगर महामार्गाची पाहणी केल्यानंतर महामार्गाला पर्यायी रस्ता असणाऱ्या खांदवेनगर ते कटकेवाडीपर्यंतच्या आरपी रोडचे काम करण्याचा मुद्दा समोर आला आहे. यानुसार पवार व जिल्हाधिकारी यांनी पीएमआरडीएला 8.80 किमी नियोजित रस्त्याच्या कामाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर पीएमआरडीएने पाहणी करून अहवाल तयार केला. जमिनीची उपलब्धता व येणारा खर्च लक्षात घेता 30 मीटरपैकी 7 मीटर रुंदीने (दोन लेनचे) खडीकरण व डांबरीकरण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी 12 कोटी 46 लाखांची खर्च अपेक्षित आहे. प्रस्तावित रस्त्याच्या भूसंपादनासाठी जमीन मालकांना पीएमआरडीएकडून एफएसआय/टीडीआर दिला जाणार आहे.
वाघोली येथे पुणे-नगर महामार्गाला पर्यायी दोन आरपी रोड प्रस्तावित करण्यात आले आहेत. एक खांदवेनगर जकातनाका ते कटकेवाडीपर्यंत तर दुसरा खांदवेनगर ते बीजेएस कॉलेजपर्यंत आहे. बीजेएस कॉलेजपर्यंतचा आरपी रोड करण्यासाठी पीएमआरडीएने पाऊले उचलली होती. परंतु स्थानिक जमीन मालकांनी विरोध केल्याने या रोडवर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. खांदवेनगर ते आव्हाळवाडी रस्त्यापर्यंत प्रस्तावित आरपीरोड करण्यासाठी पीएमआरडीएने पाऊले उचलली आहेत. या रोडवर बांधकामे कमी झाले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी आरपी रोडसाठी जागा सोडल्या असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असले तरी याठिकाणी देखील पीएमआरडीए भूसंपादनासाठी रकमेऐवजी एफएसआय/टीडीआर मोबदल्यात देणार असल्याने जमीनमालक विरोध दर्शवून काम रखडवू शकतात, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
शिक्रापूरमध्येही पाबळ व चाकण चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या लांब रांगा लागतात. यामुळे वाघोलीप्रमाणेच शिक्रापूरमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या