शिरूरमधून जि.प. अध्यक्षपदासाठी 'या' महिला इच्छुक

Image may contain: outdoorशिरूर, ता. 8 जानेवारी 2020: जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील २४ महिला जिल्हा परिषद सदस्यांपैकी तब्बल १७ जणींनी अध्यक्षपदावर संधी देण्याची मागणी या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे केली आहे. यामध्ये शिरूर तालुक्‍यातील सर्वाधिक सहा महिला इच्छुक आहेत.

रेखा बांदल, सुनीता गावडे, स्वाती पाचुंदकर, सुजाता पवार, कुसुम मांढरे, वैशाली पाटील, अर्चना कामठे, अनिता इंगळे, पूजा पारगे, कल्पना जगताप, कीर्ती जगताप, कीर्ती कांचन, रोहिणी तावरे, मीनाक्षी तावर, निर्ला पानसरे, तुलसी भोर आणि शोभा कदम, या अध्यक्षपदाच्या दावेदार आहेत.


इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अध्यक्ष निवडीचे मोठे आव्हान या पक्षासमोर असणार आहे. मात्र, प्रत्येक इच्छुकाची उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुलाखत घेणार आहेत. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या महिलेचीच अध्यक्षपदी निवड होणार आहे. शिरूर तालुक्‍यातील सर्वाधिक सहा महिला तर, त्यापाठोपाठ हवेली तालुक्‍यातील पाच महिलांचा समावेश आहे. या दोनच तालुक्‍यातील मिळून अकरा जणी आहेत. उर्वरित सहा इच्छुकांमध्ये बारामती तालुक्‍यातील दोन आणि आंबेगाव, खेड, मावळ आणि इंदापूर या चार तालुक्‍यांतील प्रत्येकी एका महिलेचा समावेश आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे आगामी अडीच वर्षांसाठीचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. सर्वसाधारण महिला संवर्गात केवळ खुल्या गटातून निवडून आलेली महिलाच नव्हे, तर अन्य कोणत्याही संवर्गातून निवडून आलेली महिलाही या पदासाठी पात्र ठरत असते. त्यामुळे खुल्या गटातील महिलांबरोबरच नागरिकांचा मागास प्रवर्ग,अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांनीही अध्यक्षपदावर संधी देण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी तसे रीतसर मागणी अर्जही सादर केले आहेत.


जिल्हा परिषदेचे एकूण ७५ सदस्य आहेत. त्यापैकी बारामती तालुक्‍यातील तत्कालीन सदस्य रोहित पवार हे आमदार झाल्याने, त्यांची जागा रिक्त झाली आहे. उर्वरित ७४ सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ४२ सदस्य आहेत. शिवाय अन्य तीन सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. राष्ट्रवादीच्या ४२ पैकी २४ महिला सदस्या आहेत. शिवाय सहयोगी सदस्यांपैकी दोन महिला सदस्या आहेत. या सहयोगी सदस्यांपैकी रेखा बांदल याही अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या