वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नका, असे केल्यास...

Image may contain: one or more people, tree, sky, plant, outdoor and nature
शिरूर, ता. 9 जानेवारी 2020 : शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये किंवा टाकलेला कचरा जाळू नये तसेच वीजयंत्रणेला कोणत्याही प्रकारचे भित्तीपत्रके चिटकवू नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळ उघड्यावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शहरी भागात बसविण्यात आलेले फिडर पिलर, रोहित्र किंवा इतर यंत्रणा आदी ठिकाणी कचरा व शिळे खाद्यपदार्थ टाकण्यात येत आहे. खाद्यपदार्थामुळे छोटे प्राणी तेथे येतात व वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर वीजपुरवठा खंडित होतो किंवा प्राण्याचा नाहक जीवही जातो. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांसह वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे तसेच वीजयंत्रणेच्या परिसरात ओला व सुका कचरा टाकण्याचे टाळावे.


शहराच्या सुशोभीकरणाला प्राधान्य देत महावितरणकडून भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामांसाठी अनेक ठिकाणी नवीन फिडर पिलर बसविण्यात आले आहेत. या फिडर पिलरवर तसेच इतर यंत्रणेवर छोटे-मोठे भित्तीपत्रके चिटकविण्यात येत असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे वीजयंत्रणेचे विद्रुपीकरण होत असून फिडर पिलरचे लोखंडी पत्रे सडण्याचाही धोका आहे तसेच भित्तीपत्रके लावताना विद्युत अपघात होण्याची शक्यता आहे.


सध्या उस तोडणीचा हंगाम सुरु आहे. शेतातील उसाचे पाचट किंवा अन्य कचरा वीजतांराखाली जाळल्यामुळे तारा वितळून वीजपुरवठा खंडित होण्याचा आहे किंवा क्षतीग्रस्त झालेल्या वीजतारा कधीही तुटून अपघात होण्याची शक्यता आहे. शेतीसह इतर ठिकाणी सुद्धा ओव्हरहेड वीजतारांखाली असलेल्या कचर्‍याचा ढिगारा पेटविल्यामुळे किंवा त्यास आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेजवळ कचरा टाकणे किंवा जाळणे तसेच यंत्रणेला भित्तीपत्रके चिटकविणे आदींमुळे विद्युत अपघाताचा धोका असल्यामुळे असे प्रकार टाळावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या