ग्राहकांना किफायतशीर दराने अखंडित वीजपुरवठा

Image may contain: 6 people, people smiling, people sitting, table and indoor
मुंबई, ता. ९ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): राज्यात विजेच्या मागणीप्रमाणे किफायतशीर दरात वीज उपलब्ध करुन देण्याचे तसेच सर्व ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्‍यांनी सक्रिय व्हावे अशा सूचना ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी दिल्या.

फोर्ट येथील महावितरणच्या सांघिक कार्यालयात ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांनी आज महावितरण,महानिर्मिती,महापारेषण आणि ऊर्जा विभागातील अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली.याप्रसंगी बोलतांना ऊर्जामंत्री ना.डॉ.राऊत म्हणाले की,वीज वितरण हानी कमी करण्यासाठी उपाययोजना करून ऊर्जा विभागात नाविण्यपूर्ण योजना आणाव्यात.सर्व योजनांमध्ये सुसंगतता आणावी,समुद्राच्या लाटेपासून देखील वीजनिर्मितीचा पर्याय ऊर्जा विभागाने पडताळून पहावा असे आवाहन त्यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना केले.

ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी याकरिता ऑनलाईन प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा.ग्राहकांचा विजेवरील होणारा खर्च कमी करण्यासाठी वीजनिर्मितीचा खर्च कमी करण्यात यावा.वीजनिर्मितीमध्ये कार्यक्षमता वाढवावी.विदर्भ व मराठवाडयात सौर ऊर्जेची चांगली क्षमता आहे.त्याचा पुरेपूर वापर  सौरऊर्जा निर्मितीसाठी करण्यात यावा,सौर कृषिपंपाबाबत सुरू असलेल्या वेगवेगळ्या योजना एकत्रितपणे राबविण्यात याव्यात.सर्व शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा सयंत्र स्थापन करण्यात यावे,इत्यादी सूचना मा.ऊर्जामंत्र्यांनी दिल्यात.

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणच्या कामकाजाची माहिती दिली.तसेच महानिर्मितीचे संचालक (संचालन) चंद्रकांत थोटवे यांनी महानिर्मिती तर,संचालक (प्रकल्प) रवींद्र चव्हाण यांनी महापारेषणच्या कामकाजाची माहिती दिली.मेडाचे महासंचालक कांतीलाल उमप यांनी मेडातर्फ़े राबविण्यात येत असलेल्या कार्याविषयी माहिती दिली.

या बैठकीत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार,महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानोटिया,ऊर्जा दक्षता समितीचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्यासह तिनही कंपन्यांचे संचालक व ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या