पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद शिरूर तालुक्याला मिळणार?

Image may contain: outdoor
शिरूर, ता. 10 जानेवारी 2020: पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद शिरूर तालुक्याला मिळणार का? याकडे आज (शुक्रवार) शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिरूर तालुक्यामधून सहा महिला अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.

पुणे जिल्हा परिषदेचे नवे पदाधिकारी निवडताना नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देत, किमान जिल्हा परिषदेत तरी भाकरी फिरवा, अशी मागणी झेडपीतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तरुण सदस्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. यामुळे पवार झेडपीत भाकरी फिरवणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सात तालुक्‍यांतील सदस्यांनी अध्यक्ष पदावर संधी देण्याची मागणी केल्याने, या तालुक्‍यांमध्येच अध्यक्षांसाठी रस्सीखेच असणार आहे.


नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची शनिवारी (ता.11) निवड केली जाणार आहे. त्यामुळे अजित पवार आज (शुक्रवार) इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर तरुण आणि नव्या चेहऱ्यांनी भाकरी फिरविण्याची आणि पक्षाचा आमदार नसलेल्या तालुक्‍यांना प्राधान्याने संधी देण्याची मागणी केली आहे.


पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्याने अजित पवार ठरवतील, तोच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी असणार आहेत. मात्र याआधी जिल्हा परिषदेत विविध पदांवर काम केलेल्या सदस्यांनी अनुभवाचा मुद्दा पुढे करत अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदावर पुन्हा संधी देण्याची मागणी केली आहे. यामुळे तरुण सदस्य कोणालाही दुसऱ्यांदा संधी देऊ नका, अशी मागणी मुलाखतीच्यावेळी पवार यांच्याकडे करणार आहेत. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत बारामती, इंदापूर, आंबेगाव, शिरूर, खेड, मावळ आणि हवेली या सात तालुक्‍यांचा समावेश आहे.

मात्र, विद्यमान अध्यक्ष बारामती तालुक्‍यातील आहेत. शिवाय आंबेगाव आणि इंदापूर या तालुक्‍यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे पदाधिकारी पदांच्या स्पर्धेतून हे तीन तालुके बाद होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. पुरंदर आणि वेल्हे तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही सदस्य नसल्याने हे दोन तालुके आपोआप स्पर्धेतून बाद झाले आहेत. उपाध्यक्षांसाठी बारा, बांधकाम सभापतीसाठी दहा, कृषीसाठी सहा, सामाजिक न्यायसाठी पाच आणि महिला व बालकल्याण समिती सभापतीसाठी चार सदस्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. अनेकांनी किमान हे नाही तर ते, असे एखादे पद मिळेल, या आशेने तीन ते चार पदांसाठी इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी पक्षाकडे स्वतंत्र मागणी अर्ज केले आहेत. त्यानुसार 42 सदस्यांनी 55 इच्छा अर्ज केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या