...म्हणून शिरूर तालुक्याला मिळाले नाही अध्यक्षपद

Image may contain: 1 person, smilingशिरूर, ता. 13 जानेवारी 2020: पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिरूर तालुक्याला मिळायला हवे होते. पण, मंत्रीपद, नात्याचा मुद्दा कमी शिक्षण या कारणांमुळे शिरूर तालुक्याला अध्यक्षपद मिळू शकले नाही.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून जिल्ह्यातील दोन दिलीप पाटलांमधील चढाओढीत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी बाजी मारली. दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपदामुळे माघार घेण्याची वेळ आली.


पुणे जिल्हा परिषदेचे आगामी अडीच वर्षांसाठीचे अध्यक्षपद खुल्या गटातील महिलेसाठी राखीव आहे. या पदावर आपल्याच मतदारसंघातील आणि आपल्याच कार्यकर्त्यांची निवड व्हावी, अशी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच आमदारांची इच्छा होती. मात्र, जुन्नरमध्ये राष्ट्रवादीकडे महिला जिल्हा परिषद सदस्य नाही. त्यातून हा मतदारसंघ आपोआप अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाद झाला. त्यामुळे बारामती, इंदापूर, शिरूर, खेड, आंबेगाव आणि मावळ हे सहाच तालुके शर्यतीत राहिले होते.

मावळते अध्यक्ष विश्‍वास देवकाते हे बारामती तालुक्‍यातील आहेत. त्यामुळे अजित पवार यांचा बारामती तालुका या शर्यतीतून बाद झाला. उर्वरित पाच आमदारांपैकी अशोक पवार, दिलीप मोहिते आणि सुनील शेळके या तीन आमदारांनी मंत्रिपदाचे कारण पुढे करत वळसे पाटील यांच्या आंबेगाव आणि दत्तात्रेय भरणे यांच्या इंदापूर तालुक्‍याचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न केला. या सर्व घडामोडींमुळे शेवटच्या टप्प्यात अध्यक्षपदाच्या शर्यतीत शिरूर, मावळ आणि खेड हे तालुके राहिले.
शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी पत्नी सुजाता पवार यांचे नाव पुढे केले. मात्र, नात्याच्या मुद्यावरून त्यांचे नाव मागे पडले. त्यामुळे या स्पर्धेत केवळ तीनच नावे उरली. त्यात शोभा कदम (मावळ), स्वाती पाचुंदकर (शिरूर) आणि निर्मला पानसरे (खेड) यांचा समावेश होता. यापैकी कमी शिक्षणाच्या मुद्यावरून कदम यांचा पत्ता हा कट झाला. त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात पाचुंदकर आणि पानसरे ही दोनच नावे टिकून राहिली. त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करणे बाकी राहिले होते. त्यात वळसे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील पाचुंदकर यांच्या; तर मोहिते पाटील यांनी पानसरे यांच्या नावाचा आग्रह धरला. परंतु, मात्र, पाचुंदकर या शिरूर तालुक्‍यातील असल्या तरी त्यांचा मतदारसंघ आंबेगाव विधानसभेला जोडलेला आहे. त्यामुळे वळसे पाटील यांना मंत्रिपदामुळे पाचुंदकर यांच्या नावाचा आग्रह सोडावा लागला. परिणामी पानसरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या