गर्लफ्रेंडसमोर पगार विचारल्यावर युवकाने थेट...

पुणे, 14 जानेवारी 2020: हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसमोर पगाराबाबत विचारल्यामुळे वैतागलेल्या युवकाने समोरच्या व्यक्तीला थेट रॉडनेच मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली. याप्रकरणी 28 वर्षांच्या व्यक्तीने येरवडा पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

येरड्यातील शास्त्रीनगर भागतील एका हॉटेलमध्ये अँथनी नावाचा युवक आपल्या गर्लफ्रेंडसोबत बसला होता. तेव्हा तेथील एक व्यक्ती अँथनीसोबत गप्पा मारू लागला. थोडा वेळ गेल्यानंतर त्या व्यक्तीने सहज बोलता बोलता अँथनीला कुठे काम करतो आणि पगार किती आहे, अशी विचारणा केली. या प्रश्नाने भडकलेल्या अँथनीने थेट त्या व्यक्तीसोबत भांडण करण्यास सुरुवात केली.

अँथनीने नंतर त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी आपल्या भावासह इतर तीन मित्रांना बोलावून घेतले. त्यानंतर चौघांनी मिळून पगाराबाबत प्रश्न विचारणाऱ्याला रॉडने मारहाण केली. यामध्ये त्या व्यक्तीच्या हाताला आणि पायाला जखम झाली आहे. मारहाण झाल्यानंतर संबधित व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी, येरवडा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित मोरे (रा. करण सोसायटी, वडगाव), रॉनी अर्कस्वामी, अँथोनी अर्कस्वामी (दोघे रा़ नामदेवनगर, वडगाव शेरी) आणि नानू (रा़ ताडीवाला रोड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या