छत्रपती शिवाजी महाराज आणि ऐतिहासिक वाद

Image may contain: 1 person, sitting and beard
शिरुर,ता. १४ जानेवारी २०२०: मुळातच इतिहासातून बोध घ्यायचा असतो मात्र इतिहासावर प्रश्न निर्माण करावयाचे नसतात.काही प्रश्नांनी प्रश्न वाढतच जातात.त्यात जनतेच्या अस्मिता एखाद्या व्यक्ती ,प्रसंग ,घटना यासोबत जोडलेल्या असतील तर मग याचे परिणाम मात्र व्यवस्थेबरोबर अगदी तळागाळातील व्यक्तीला देखील भोगावे लागतात . याची प्रचिती जगाने वेदांचे अर्थ लावण्यापासून , मार्टिन ल्युथर च्या धर्म शुद्धीकरनाच्या प्रोटेस्टंट चळवळीपर्यंत ते कालच्या मोदीची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यापर्यंतचा ताजा इतिहास याला साक्ष आहे.
   
इतिहास  व ऐतिहासिक घटना आणि त्यामुळे तयार होणारे वाद हे लिखित पुस्तके आणि काही इतिहास  संशोधनाच्या माध्यमातून तयार होतात .  मग आपली राजकीय किंवा स्वार्थी विचारांची पोळी भाजणारी हितसंबंधी मंडळी यात उडी घेऊन हे प्रकरण किती दिवस वाढवता येईल अन आपला यात काय फायदा होईल याचाच विचार करत असतात .वादग्रस्त इतिहासाचाही किनार हि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला पुरेपूर लागू पडते . छत्रपती हिंदू धर्मरक्षक कि सर्वधर्मसमभाव जपणारे राजे होते याचे विविध तर्कवितर्क लावले जातात आणि चर्चेच्या माध्यमातून बुद्धिजीवी वर्गात हे विषय चोखाळे जाऊन त्याचा आंशिक ऊतारा व मुद्दे सामान्य जनतेला वादासाठी व जुनी प्रकरणे पेटविण्यासाठी दिली जातात . सामान्य लोकांच्या भावना छत्रपतींशी जोडल्या असल्याने परस्परसंबंधी  लोक त्याचा आपल्या सोयीने वापर करण्याचा प्रयत्न करतात.

पुस्तके हि सामान्य लोकांपर्यंत पोहचण्याचे प्रभावी माध्यम असल्याने बरीचशी पुस्तके हि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक वादाला कारणीभूत ठरतात त्यापैकी काही पुस्तके आणि त्यासंबंधी झालेलं वाद ..

  जेम्स लेन आणि ''Shivaji: Hindu King in Islamic India''

ऑक्सफर्ड प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या  पुस्तकात लिहलेल्या मजकूर हा छत्रपतींच्या इतिहाला गालबोट लावणारा आहे अशी वादळी चर्चा त्या काळात झाली .त्यावेळी केंद्रात हिंदू  विचारसरणीचे सरकार होते.परंतु त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी या पुस्तकावरील बंदी हि चुकीची आहे असं समर्थन दिल होत . शिवशाहीर बाबासाहेव पुरंदरे यांनीही या पुस्तकाची स्तुती केल्याचे उल्लेख हि त्यावेळी आढळतात.शरद पवार यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी जेम्स लेन ला भारतात आणून हा उद्योग घडविला असा आरोप त्यांच्यावर देखील झाला होता.२०१० साली ज्यावेळी या पुस्तकावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली त्यावेळी महाराष्ट्रात प्रचंड गदारोळ झाला होता.पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था हि जेम्स लेन च्या पाठीशी आहे यावरून तिथे जाळपोळ आणि तोडफोड  करून अनेक जुने संदर्भ जाळण्याचा प्रकार काही संघटनांकडून केला गेला. या प्रकरणात  सरकारने योग्य भूमिका घेतली नाही म्हणून आपण युती सोडत असल्याची घोषणा सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती .

साम्यवादी विचारवंत गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?'

अगदी सत्तर पानी पुस्तकातील शिवाजी महाराज 'गोब्राह्मणप्रतिपालक होते कि कुळवाडी भूषण होते?' या मुद्द्यावर वाद अजून सुरु आहे. काही संघटना आणि  संस्थांकडून चुकीच्या मुद्द्यावर सुरु असलेला हा वाद मोठ्या जोशाने  चालवला देखील जात आहे.गोविंद पानसरे यांच्या कोल्हापूर येथील  हत्येनंतर या पुस्तकास जास्त वलय मिळाले व डाव्या अन उजव्या विचारसरणीच्या कंगोऱ्यावर वाद पेटता ठेवण्याचं काम काही बुद्धिजीवी लोक या पुस्तकाचा वाद म्हणून ठेवतात.

बाबासाहेब पुरंदरे आणि "राजा शिवछत्रपती"

सदर पुस्तक हे ब्राह्मणाचे उदात्तीकरण करणारे आहे त्यामुळे  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ज्यावेळी राज्य शासनाने "महाराष्ट्र भुषण" हा पुरस्कार देणार असल्याचे घोषित केले त्यावेळी हा पुरस्कार शिवद्रोह्याला दिला जातो आहे असा प्रमुख आक्षेप अनेक डाव्या संघटनांनी घेतला असुन त्यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह मानली जाणारी पुस्तकातील मजकुराची पाने सोशल मिडियातुन वावटळीसारखी सर्वत्र पसरवली गेली .पुरंदरे ना महाराष्ट्र भूषण दिला जाऊ नये म्हणून कार्यक्रम हाणून पाडण्याचे अयशस्वी पराक्रम हि त्यावेळी काही राजकीय मंडळी आणि संघटनांनी केले.

डॉ. विनोद अनाव्रत  आणि ''शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव''
                
पुण्यातील एल्गार परिषद कार्यक्रमात पुण्याच्या सुगावा प्रकाशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक विकले गेल्याने पुण्यात गदारोळ झाला होता. अनाव्रत यांनी या आधी ’शिवधर्म: हिन्दु धर्माशी फारकत की संगनमत’ हे पुस्तक लिहिले होते. आधीचे पुस्तक सरळ सरळ मराठा समाजाच्या विरोधात होते असे आरोप त्यावेळेही. शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव हे पुस्तक एकाच वेळी छ. शिवाजी महाराज, मराठा समाज आणि ब्राम्हण या सगळ्यांना टार्गेट करते आहे असा आरोप करून पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी अनेक हिंदू संघटनांनी केली होती. हे पुस्तक लिहून लेखकाने लिहिता-लिहिता या पुस्तकात मराठ्यांना छ. शाहू महाराज व औरंगजेब हे शिवाजी महाराजांपेक्षा श्रेष्ठ होते हे मान्य करावे असा अनाहूत उद्योग केला होता .

जयभगवान गोयल आणि ''आज के शिवाजी नरेद्र मोदी''
                
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना करणारे ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी पुस्तक १२ जानेवारी  प्रकाशित झाले. हे पुस्तक भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहले आहे. यात नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज  यांच्याशी केल्याने या  पुस्तकावरुन राज्यातील व देशातील राजकारण प्रचंड तापले आहे. विरोधकांनी या पुस्तकावरुन भाजपवर प्रचंड टीकेची झोड उठवली आहे.

शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्या पक्षांना खरंच मतं मिळतात? हा वादादीत विषय आहे पण  शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन अनेक लोक आपल्या स्वार्थी पोळ्या वेळो वेळी भाजत आली आहेत त्यात डावे - उजवे यात कोणीच मागे नाहीत . वेळ आली तेव्हा छत्रपतींच्या घराण्याचा कसा योग्य वापर करावा याची मेख हि महाराष्ट्राने मागील आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाहिली . पुरोगामी आणि प्रतिगामी लोक शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वापर करायला सोयीने मोकळे होतात ..


रितेश उषाताई भाऊसाहेब पोपळघट (शिरुर)
७५०७६१०४४९


   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या