रस्त्यावर छेड काढणा-यांना पोलीस स्टेशनची वारी

Image may contain: 3 people, people smiling, tree, sky and outdoorशिरुर, ता.१५ जानेवारी २०२०(प्रतिनीधी) : बुलेटच्या पुंगळया काढुन जोर-जोरात गाडया पिटाळणे,रस्त्याने जाणा-या शाळेच्या मुली, महिलांना अश्लिल हातवारे करत गर्दीत छेड काढणा-या सख्याहरींवर शिरुर पोलीस स्टेशनच्या पथकाने रस्त्यावरच धुलाई करुन गुन्हे दाखल करत सडकसख्याहरींना थेट पोलीस स्टेशनची वारी घडवुन आणली.

शिरुर शहरात गेल्या काही दिवसांपासुन निर्माण प्लाझा,सी.टी.बोरा कॉलेज रोड,रेव्हेन्यु कॉलनी रस्ता, बसस्थानक परिसर,जिजामाता उद्यान परिसर आदी ठिकाणी रोडरोमिओंनी अक्षरश: उच्छाद मांडला होता.नागरिकांनी सतत यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु प्रशासन माञ ठप्प होते.आमदार अशोक पवार यांनी जनता दरबारात कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रमुख अधिका-यांची चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर प्रशासन खडबडुन जागे झाले.शुक्रवार (दि.१०) रोजी सकाळपासुनच पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत टवाळखोर तसेच हुल्लडबाजी करणा-यांवर कारवाई सुरु केली.यावेळी बुलेटच्या पुंगळया काढुन फटाके आवाज काढणे,मुलींना व महिलांना दुचाकीवरुन कट मारणे,छेड काढणे असे उद्योग करणा-या कॉलेज व परिसरातील २५ सडक सख्याहरींवर गुन्हे दाखल केले तर २१ दुचाकींवर कारवाई करुन १६ हजार ३०० रुपये दंड आकारण्यात आला.

हि कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस हवालदार एस.डी. चौधरी,पोलीस हवालदार एस.बी. कदम, पोलीस कॉंन्स्टेबल जे.के.मांडगे, महिला पोलीस काॅन्स्टेबल आर.एम.शेख, पोलीस कॉंन्टेबल के.डी.धवडे, पोलीस कॉंन्स्टेबल एस.बी.खोडदे यांनी केली.यावेळी बोलताना शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी सांगितले कि, जर मुली व महिलांना रस्त्यावर ञास दिला,छेड काढली तर गुन्हेगारांची गय करणार नाही, पोलीस प्रशासन कडक कारवाई करण्यास सक्षम असल्याचे सांगत शिरुर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी केले. तर पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी अल्पवयीन मुलांकडे वाहने देउ नका असे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या