वाघाळे येथील दोघांच्या मृत्युला जबाबदार कोण?

Image may contain: one or more people
वाघाळे, ता. 17 जानेवारी 2020: वाघाळे-रांजणगाव दरम्यान पिंपरी दुमाला हद्दीतील असलेल्या चासकमान कालव्याच्या पुलावरून मोटार कोसळल्याने दोन तरुणांना जीव गमवावा लागला. पुलाला संरक्षक कठडे नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शींनी सांगितले. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेक दिवसांपासून मागणी आहे. दोन युवकांच्या मृत्युला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
वाघाळे-रांजणगाव हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. रांजणगाव एमआयडीसीमध्ये अनेक युवक कामानिमित्त रात्री-अपरात्री प्रवास करत असतात. अनेकदा या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली. परंतु, या मागणीकडे अनेकांनी कानाडोळा केला. अनेकदा या रस्त्यावर अपघात झाले आहेत. अखेर या रस्त्यावर दोन युवकांना जीव गमवावा लागला. यानंतर तरी प्रशासनाला, राजकीय व्यक्तींना जाग येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या पुलावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. एमआयडीसीतील कामगार या रस्त्याने ये-जा करतात. मात्र, या पुलाला सरंक्षक कठडे नसल्याने तो वाहतुकीस धोकादायक झाला आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला तीन दिवस उलटूनही पुलावर अद्याप कठडे बसविले नाहीत. कठडे नसल्यानेच मोटार पुलावरून खाली कोसळली, असेही प्रत्येक्षदर्शींनी सांगितले. या पुलाला तातडीने सिमेंटचे संरक्षक कठडे बसविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Image may contain: 2 people, people smiling, people standing

दरम्यान, लक्ष्मण ऊर्फ लखन भानुदास रासकर (वय 23) व बापू बाळू रासकर (वय 36, दोघे रा. अण्णापूर, ता. शिरूर) असे अपघातातील मृतांची नावे आहेत. हरीश झंजाड यांच्या मोटारीतून मंगळवारी रात्री लक्ष्मण व बापू हे रांजणगाव एमआयडीसीत कामानिमित्त गेले होते. तेथून झंजाड मित्राच्या मोटारीने पुण्याला गेले. त्यानंतर लक्ष्मण आणि बापू मोटार घेऊन रांजणगाव-वाघाळे रस्त्याने अण्णापूरकडे निघाले होते. मात्र, काही काम राहिले असावे; म्हणून ते वाघाळेहून पुन्हा रांजणगावकडे येत असावेत. त्या वेळी सातच्या सुमारस त्यांची मोटार पिंपरी दुमाला हद्दीतील चासकमान कालव्याच्या पुलावरून खाली कोसळली. त्यानंतर पाण्यात बुडून व मोटारीत गुदमरून दोघांचा मृत्यू झाला.

रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी प्रफुल्ल भगत, मिलिंद देवरे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने आणि स्थानिकांच्या मदतीने मोटार कालव्यातून बाहेर काढली. पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या