...म्हणून शिरूरच्या माहेरवासीने सोडला प्राण!

शिरूर, ता. 21 जानेवारी 2020: एकुलता एक मुलगा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यामुळे विरह सहन न झाल्यामुळे एका मातेने प्राण सोडला आहे. संबंधित माता ही शिरूर तालुक्याची माहेरवासीन आहे.

आरती ललित नहाटा (वय 47, रा. दत्तवाडी-पुणे) असे पुत्रविरहाने मृत्यू झालेल्या मातेचे नाव आहे. आरती नहाटा यांचे शिरूर हे माहेर असून "एचपी गॅस'चे शिरूरमधील मुख्य वितरक सुमतीलाल दुगड यांच्या त्या कन्या होत. आरती यांच्या निधनाने दुगड कुंटुबियांनाही मोठा धक्का बसला असून दुगड कुटुंबीय व शिरूरमधील नातेवाईकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.


आरती नहाटा यांचा एकुलता एक मुलगा ऋषभ ऊर्फ सोनू नहाटा (वय 20) हा काही दिवसांपूर्वी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेला आहे. एकुलता एक मुलगा परदेशात जाऊन शिकणार, मोठा होणार याचे समाधान आरती यांना होते; पण त्याचा विरहदेखील त्यांना अस्वस्थ करीत होता. नुकताच पुण्यात तो येऊन शनिवारी (ता. 18) पुन्हा अमेरिकेला रवाना झाला. त्यानंतर आरती या अस्वस्थ झाल्या. त्यांना रविवारी (ता. 19) सकाळी खासगी रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. उपचारादरम्यान रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, त्यांचा मुलगा ऋषभ अमेरिकेत पोचलाही नव्हता, तोच त्याला आईच्या मृत्यूची बातमी मिळाली. त्यामुळे तो अर्ध्या वाटेवरून पुन्हा पुण्यात येण्यास निघाला. तो आल्यानंतर आज (मंगळवार) सकाळी आरती यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नहाटा कुटुंबियांकडून सांगण्यात आले.


"आरतीला कसलाही आजार नव्हता. केवळ मुलगा परदेशात शिकायला जाणार असल्याच्या विचाराने ती अस्वस्थ होती. त्यातूनच तिचा रक्तदाब कमी झाला,'' असे त्यांचे भाऊ पियूष दुगड यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या