काका माझे लग्न ठरलेय म्हणून पाया पडला अन्...

शिरूर, ता. 2 फेब्रुवारी 2020: "काका माझे लग्न ठरले असून, असे म्हणत पाया पडला. लग्नात अंगठी करायची आहे. तुमच्या बोटातील अंगठीची डिझाईन सुंदर असून, तशीच अंगठी करायची असल्याने फोटो घेण्यापुरती अंगठी द्या' असे म्हणून अंगठी चोरून धक्का मारून पळून जायचे. या टोळीतील दोघांना शिरूर पोलिसांनी सिनेस्टाईल थरारक पाठलाग करून पकडले.


या वेळी केलेल्या चौकशीत त्यांनी सहा गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. चोरलेल्या अंगठ्या विकत घेणाऱ्या बारामती येथील दोघा सराफांनाही अटक केली असून, त्यांच्याकडून सात लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या जप्त केल्या आहेत. अशोक नामदेव गंगावणे व अनिल रघुनाथ बेलदवडे (दोघे रा. बांदलवाडी, ता. बारामती) अशी चोरट्यांची; तर पंकज विलास शहाणे व सतीश लालचंद भंडारी (रा. बारामती) अशी चोरीच्या अंगठ्या त्यांच्याकडून स्वस्तात विकत घेणाऱ्या सराफांची नावे आहेत. त्यांच्याकडून 17 तोळे सोन्याच्या अंगठ्या; तसेच चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरलेली "पल्सर' मोटारसायकल जप्त करण्यात आली.

शिरूरसह रांजणगाव एमआयडीसी, शिक्रापूर, यवत, वडगाव निंबाळकर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सहा गुन्ह्यांची कबुली चोरांनी दिली असून, चोरीला गेलेला सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे शिरूरच्या पोलिसांनी सांगितले. सरदवाडी (ता. शिरूर) जवळ गेल्या 16 जानेवारीला घडलेल्या घटनेत गंगावणे व बेलदवडे यांनी सुरेश विश्‍वनाथ घावटे (रा. न्हावरे फाटा, शिरूर) यांना अशा प्रकारे लुटले. रस्त्याने जात असताना चोरट्यांनी त्यांना थांबवले व परिचय असल्याचा बहाणा करून त्यांच्या पाया पडले. "काका माझे लग्न ठरले असून, सोन्याच्या अंगठ्या करायच्या आहेत. तुमच्या बोटातील अंगठ्यांच्या डिझाईन छान आहेत. मोबाईलमध्ये फोटो घेण्यासाठी अंगठ्या देता का', असे म्हणून त्यांनी तीन अंगठ्या ताब्यात घेतल्या. एकाने हातात अंगठ्या घेतल्या; तर दुसऱ्याने फोटो घेण्याचा बहाणा करून अंगठ्या खिशात टाकल्या व त्यांना धक्का मारून ते मोटारसायकलवरून पसार झाले. असाच प्रकार रांजणगाव, शिक्रापूर व यवत परिसरातही झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलिसांना अलर्ट केले. त्यातून पोलिस आरोपींच्या शोधासाठी सक्रिय झाले होते.दरम्यान, संशयित चोरटे शिरूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी संजय जाधव, जितेंद्र मांडगे, करणसिंग जारवाल, संजय साळवे, विजय जंगम या पोलिसांसह जोशीवाडी परिसरात सापळा लावला. तेव्हा गंगावणे व बेलदवडे हे पल्सरवरून संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्यांना हटकले. पोलिसांचा सुगावा लागताच त्यांनी पल्सर गोलेगावच्या दिशेने भरधाव दामटली. यादरम्यान पोलिसांनी जीप; तसेच मोटारसायकलींवरून थरारक पाठलाग करीत काही अंतरावर त्यांना पकडले. 

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या