ग्रामपंचायत निवडणूकीसाठी हरकती 'या' तारखेपर्यंत...

No photo description available.
शिरूर, ता. 6 फेब्रुवारी 2020: पुणे जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आता आरक्षण सोडतीवर हरकती दाखल होणार आहेत. या हरकती प्रत्येक तालुक्‍यांतील तहसील कार्यालयात सादर करण्याची अंतिम तारीख शुक्रवार (ता. 14) पर्यंत आहे. गावगाड्यातील हमरीतुमरी तहसील कार्यालयात उमटणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मागविण्यासाठी तहसीलदारांनी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख शुक्रवारी (ता. 7) पर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सादर करण्याची अंतिम तारीख (ता. 14) आहे. प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांच्या सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर सादर करण्याची मुदत 20 फेब्रुवारी आहे. प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर (ता. 29) प्रांताधिकारी सुनावणी घेणार आहेत. त्यानंतर ता. 11 मार्च रोजी सुनावणीनंतर अभिप्रायासह अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर होणार आहेत. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना ता. 21 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमधील सूचना आणि हरकतीचे धूमशान हे मार्चपर्यंत तेवत राहणार आहे.राज्य निवडणूक आयोगाकडून 20 डिसेंबर 2019 पासून निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वात मोठा टप्पा असलेल्या 750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. प्रत्येक तालुक्‍यांतील तहसीलदारांनी गुगल मॅपवर प्रत्येक गावांचे नकाशे तयार केले आहेत. त्यानंतर संबंधित तलाठी आणि ग्रामसेवकांनी संयुक्‍तपणे स्थळपाहणी केली आहे. प्रभाग आणि आरक्षण निश्‍चित केले आहेत. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर आवश्‍यकता असल्यास दुरूस्त्या केल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील आरक्षण सोडतीनंतर तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये बेरजेचे राजकारण सुरू झाले आहे. त्यात काही प्रभाग रचनेत प्रबळ उमेदवारांमुळे प्रस्थापित तर कधी विरोधकांचा कस लागणार आहे. यात काही ठिकाणी प्रभागातील बदल आणि काही नेत्यांना सोयीस्कर झाले आहे. त्याचा परिणाम अटीतटीच्या लढतीत परिणामकारक ठरणार आहे. या प्रभाग रचनेला हरकत घेण्यासाठी स्थानिक गावकारभाऱ्यांनी बळ एकवटले आहे. त्यातून हरकतींचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच काही स्थानिक नेत्यांकडून कोलदांडा घालण्याची शक्‍यता आहे.दरम्यान, हरकतीवर चांगलेच रान पेटणार आहे. त्याचा परिणाम निकालावर होणार आहे. तसेच चुरशीच्या लढतीत ग्रामपंचायत ताब्यातून निसटून जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गावाची सूत्रे ताब्यातून जाण्याची भीती स्थानिक नेत्यांना सतावत आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक गावांतील राजकीय संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे हरकती घेऊन निवडणुकांमध्ये विघ्ने आणण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पुणे जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायत निवडणुकांपैकी खेड, शिरूर, इंदापूर, भोर, हवेली ही तालुके संवेदनशील आहेत. यात राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, भाजपचे नेते आहेत. त्यात महाविकास आघाडी झाल्यामुळे स्थानिक नेत्यांची गोची झाली आहे. त्याचा परिणाम गावपातळीवर उमटत आहेत. आता तालुक्‍यातील आजी- माजी आमदार, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक नेत्यांना बळ दिल्यास दुसरा गट नाराज होईल, अशी भीती आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या निवडणुकीपासून चार हात दूर राहत आहेत. संवेदनशील गावांतून हरकती जादा येण्याची शक्‍यता आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या