शिरूर ग्रामीण रुग्णालयाच्या दुरावस्थेचा रुग्णांना फटका...

शिरूर, ता. 7 फेब्रुवारी 2020: शिरूर ग्रामीण रुग्णालयामध्ये लिफ्ट नसल्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. त्यातच रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी अनेक दिवसांपासून गैरहजर असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. यामुळे रुग्णांना मरणयाताना सहन कराव्या लागत आहेत.ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या ग्रामीण रुग्णालयातील लिफ्ट बसवावी म्हणून मागणी केली आहे, परंतु, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दुर्लक्ष केले आहे. ग्रामीण रुग्णालय बांधकाम करताना रुग्णालयात दोन लिफ्टसाठी जागेची सोय केली आहे. परंतु, लिफ्टच्या जागेचे बोगदे प्लायवूड मारून बंद केलेले आहेत. शिरूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असून, या रुग्णालयात तीनशे ते चारशे रुग्णांची तपासणी करून औषध गोळ्या दिल्या जातात. या दवाखान्याच्या ग्राउंड फ्लोअर ला ओपीडी, शस्त्रक्रिया विभाग, रुग्णांच्या खाटा, डॉक्‍टरांची रूम, औषधालय आहे. तर रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर रुग्णालयाचे कार्यालय, नेत्र तपासणी विभाग, रक्त लघवी तपासणी विभाग, गरोदर महिलांची तपासणी विभाग, सर्व महत्त्वाचे विभाग आहेत.लिफ्ट अभावी या विभागात किंवा पहिला मजल्यावर जाण्यासाठी वीस पायऱ्या चढून जावे लागत आहेत. हे रुग्णांसाठी त्रासदायक ठरत आहे. लहान मुलाला घेऊन महिला, वृद्ध व्यक्तींना एवढ्या पायऱ्या चढणे खूप कठीण आहे. गरोदर महिलांनाही एवढ्या पायऱ्या चढून पहिल्या मजल्यावर जाणे जोखीमीचे आहे. या सर्वांचा विचार करता शिरूर ग्रामीण रुग्णालयात तत्काळ लिफ्ट बसवावी व रुग्णांची या त्रासातून सुटका मिळावी, अशी मागणीही रुग्णांच्या नातेवाईकांमधून होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या