शिक्रापूर-चाकण रस्त्यावर पिकअपने युवकास चिरडले...

Image may contain: 1 person, closeup
शिक्रापूर, ता.७ फेब्रुवारी २०२०२ (विशाल वर्पे) : पिंपळे जगताप (ता. शिरूर ) हद्दीमध्ये शिक्रापूर-चाकण रस्त्यावर एका पिकअप गाडीने दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना भरधाव वेगाने  दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. अरविंद सुरेश मांजरे (वय ३१, राहणार मांजरेवाडी, ता. शिरुर) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
 
चाकण-शिक्रापूर हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरू लागला आहे. या रस्त्यावर नेहमीच मालवाहू गाड्यांची सततची गर्दी पाहायला मिळते. चारचाकी प्रवाशी चालकांना, दुचाकीस्वारांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. गुरुवारी (दि. ६) सायंकाळच्या सुमारास अरविंद सुरेश मांजरे हा आपल्या दुचाकीवरून आपल्या घराकडे शिक्रापूरकडून चौफुल्याच्या दिशेने जात होता. पिंपळे जगताप हद्दीमध्ये हॉटेल शिवकृपा समोर चाकणच्या दिशेने येणाऱ्या पिकअप गाडीने (गाडी क्रमांक एम एच १२ डी जी ०२६३) दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या अरविंदच्या ताब्यात असलेल्या होंडा शाईन (क्रमांक एम एच १२ एल आर ५८२८) गाडीला धडक दिली. यावेळी अरविंदचा जागीच मृत्यू झाला.

पिकअप गाडीचा वेग जास्त असल्याने दुचाकी गाडीच्या खालून तब्बल तीस फुटाहुन अधिक लांब फरपटत गेली. युवकाच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याच्या डोक्याचा चक्काचुर झाला होता. पिकअप चालक श्रीराम राजाभाऊ सरवदे (वय २२ रा. पोहरेगाव ता. रेणापूर जि. लातूर) हा अपघातानंतर पळून जात होता. यावेळी सतिष मांजरे, भानुदास मांजरे, विशाल मांजरे यांनी पिकअपचा पाठलाग करून केला. शिक्रापूरमधील चाकण चौकात थांबवून पिकअप गाडीसह चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बी. बी. थिकोळे करत आहेत.

अन सर्व कुटूंबच विखुरले...
अरविंदच्या भावाचे देखील दहा वर्षांपूर्वी अशाच प्रकारे अपघाती निधन झाले आहे.आई वडील देखील लवकरच निधन पावले असल्याने अरविंदच्या मागे एक चार वर्षांची मुलगी आणि पत्नी आहे.संपूर्ण कुटूंबच विखुरले असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या