'वंशाच्या दिव्या' साठी आजही स्त्रीचा छळ...

Image may contain: one or more people
पिंपरी, ता. १० फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): पुण्यासारख्या शहरात दिनेशच्या कुटुंबाची स्वतःची इमारत असल्याने कल्पनाच्या आई वडिलांनी स्थळ आल्यावर मागेपुढे न पाहता दिनेशशी तिचा विवाह करून दिला.लग्नानंतर सर्व सुरळीत चालले होते.त्यातच घरात नवीन पाहुणा येणार असल्याची चाहूल लागल्याने सर्वजण आनंदी होते.पहिल्या बाळंतपणासाठी कल्पनाच्या आई-वडिलांनी तिला माहेरी नेले.प्रसूतीच्या वेळी गुंतागुंत निर्माण झाल्याने कल्पनावर सिझर करण्याची वेळ आली.कल्पनाला मुलगी झाल्याने तिच्या माहेरकडील मंडळी खूश होती.पण मुलगी झाल्याने सासरकडील मंडळी नाराज झाली.यामुळे दिव्याच्या नातेवाइकांनी नातेवाइकांची समजूत काढून तिला सासरी पाठविली.

काही दिवसांतच कल्पना पुन्हा गरोदर राहिली.दिलेल्या तारखेला कल्पनाची प्रसूती झाली आणि दुसरीही मुलगीच झाली.दोन मुली झाल्याने कल्पनाच्या सासरकडील मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला.कल्पनाला उपाशीपोटी ठेवणे,दोन मुलींना खाण्यासाठी पैसे न देणे,तिच्याकडून सतत काम करून घेणे,असा त्रास देणे सुरू केले.एवढेच नव्हे तर कल्पना आणि तिच्या मुलींना एका खोलीत वेगळे करण्यात आले.दिनेशनेही काम सोडले.दिनेशची बहीण त्याच इमारतीत राहत होती.तिची आईदेखील मुलीकडे राहू लागली.दिनेशही आपल्या आईसोबत राहू लागला.

कल्पनाने घरखर्चासाठी पैसे मागितले तर मी कामाला नाही,पैसे कोठून आणणार,असे तो सांगू लागला.यामुळे दोन्ही मुलींचीही उपासमार होऊ लागली.त्यातच तिसऱ्या अपत्यासाठी कल्पनावर तिच्या सासरकडील मंडळीकडून दबाव आणला जात होता.मात्र दोन सिझर झाल्याने तिसऱ्यावेळी कल्पनाच्या जिवाला धोका होऊ शकतो,हे डॉक्‍टरांनी आधीच सांगितले होते.मात्र तरीही वंशाच्या दिव्यासाठी तिचा छळ होऊ लागला.सततचा त्रास थांबविण्यासाठी कल्पनानेही जिवाचा धोका पत्करत तिसऱ्या अपत्यासाठी होकार दिला.ती तिसऱ्यांदा गरोदर असतानाही तिचा छळ थांबला नाही.

तिसरीही मुलगीच होईल,म्हणून तिचा छळ सुरू होता.हा छळ सहन न झाल्याने अखेर पोलिसांच्या महिला सहायक कक्षाकडे अर्ज केला.पोलीस उपनिरीक्षक मनिषा दशवंत यांनी दिव्याच्या सासू, नणंद आणि पतीला बोलविण्यास सांगितले.पोलीस कर्मचारी प्रभावती गायकवाड आणि अनिता जाधव यांनी सासरकडील व्यक्‍तींना बोलावून त्यांचा जबाब घेतला.मात्र वंशाच्या दिव्यासाठी ते अडून बसले होते.अखेर पोलिसांनी त्यांना कडक शब्दांत समज दिली. जर गुन्हा दाखल झाला तर आयुष्यभर खडी फोडावी लागेल,असे सांगितले.

दिनेशलाही कामधंदा करण्यास सांगितले.तिसरी मुलगीच झाली तरी आम्ही तिचे स्वागत करू,असे लेखी दिले.अखेर सोनाराने कान टोचल्यावर दिनेश आणि त्याचे कुटूंबिय भानावर आले.त्या दिवसापासून त्यांनी कल्पनाचा छळ थांबविला.परमेश्‍वरानेही कल्पनाला साथ दिली.तिची सुखरूप प्रसूती झाली आणि त्यांच्या वंशाला दिवाही मिळाला.आता त्यांच्या कुटुंबात आनंदी आनंद आहे.प्रत्येक क्षेत्रात आता महिला अग्रेसर आहेत.काही क्षेत्रात महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे.

मुलगा आणि मुलीमध्ये भेद करू नका,असे शासन आणि सामाजिक कार्यकर्ते,संस्था,नेत्यांकडून वारंवार सांगितले जाते.मात्र,तरीही स्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव असल्याचे आपल्याला वेळोवेळी पहायला मिळत आहे.'वंशाच्या दिव्या'साठी आजही तिचा छळ सुरू आहे.पहिल्या दोन मुली झाल्यावर तिसरीही मुलगी होईल म्हणून विवाहितेचा छळ सुरू होता.हा छळ असाह्य झाल्यावर त्या विवाहितेने पोलिसात धाव घेण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता.पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर त्यांचा संसार रुळावर आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या