Video: आमदार अशोक पवार यांनी धरला ठेका...

Image may contain: 10 people, crowd and outdoor
शिरूर, ता. 24 फेब्रुवारी 2020 : शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी "मैं हूँ डॉन...' या गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


शिरूर शहर आणि पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री रामलिंग महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान बॅंड पथकाने "मैं हूँ डॉन' हे गाणे तालात सुरू केले आणि उपस्थितांना नाचण्याचा मोह आवरला नाही. हा जल्लोषी सोहळा आमदार ऍड. अशोक पवार व शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल पाहत होते. उत्साही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तेदेखील या जल्लोषात सहभागी झाले आणि "मैं हूँ डॉन'च्या तालावर त्यांचीही पावले थिरकली..!

चाळीसगाव, येवला, वैजापूर, बारामती येथील नामांकित बॅंड पथके दरवर्षी पालखी मिरवणुकीसाठी आवर्जून हजेरी लावतात. भावगीते, भक्‍तिगीते, देशभक्‍तीपर गीते व नव्या-जुन्या हिंदी व मराठी चित्रपटांतील गाणी वाजवत जुगलबंदी रंगते. आमदार ऍड. पवार व सभागृहनेते प्रकाश धारिवाल यंदा मिरवणुकीत सुरुवातीपासून सहभागी झाले होते. बॅंड पथकांची जुगलबंदी व कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. रात्री उशिरा धारिवाल यांच्या निवासस्थानासमोर ही मिरवणूक आली असताना उत्साह शिगेला पोचला. चाळीसगावच्या बॅंड पथकाने या वेळी "ओ शंकर मेरे, कब होगे दर्शन तेरे', "रामजी की निकली सवारी' या गीतांपासून "रूप सुहाना लगता है' सारख्या रोमॅंटिक गाण्यांपर्यंत अनेकविध गाणी सादर केली. "शंकरा रे शंकरा', "माय भवानी' या "तान्हाजी' चित्रपटातील गाण्यांच्या सादरीकरणावेळी आणखी रंगत वाढली.त्याचवेळी "आया है राजा' हे गाणे वाजविले जाऊ लागले आणि अनेक जण त्यावर नाचू लागले. एका कार्यकर्त्याने "डॉन'मधील गाण्याची फर्माईश केली आणि वातावरणाचा नूरच पालटला. "मैं हूँ डॉन' गाणे वाजू लागताच उत्साही कार्यकर्त्यांनी आमदार पवार व प्रकाश धारिवाल यांना रिंगणात ओढले आणि काही काळ पद-प्रतिष्ठा विसरून त्यांनीदेखील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर झोकदार नृत्य केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार पवार यांनी मोठा विजय मिळविला. त्यामुळेच "मैं हूँ डॉन'च्या तालावरील त्यांचे नृत्य शिरूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या