अभिनेत्री भाग्यश्रीचे दणक्यात कमबॅक...

Image may contain: 1 person

'मैंने प्यार किया' या पहिल्याच चित्रपटाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री सुमारे दशकभरानंतर पुन्हा एकदा फिल्मी दुनियेत परतणार आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड अलर्ट - द वॉर विदिन' या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. तेव्हापासून सलमानच्या 'सुमन'ला मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक होते. आता मात्र भाग्यश्रीचे दणक्यात कमबॅक होणार आहे.'सीताराम कल्याण' या कन्नड चित्रपटात भाग्यश्री झळकणार आहे. यानंतर ती 'किट्टी पार्टी' शिवाय '2 स्टेट्स'च्या तेलगू रिमेकमध्ये दिसणार आहे. इतकेच नाही तर प्रभाससोबतही एक चित्रपट तिने साईन केला आहे. या चित्रपटाचे नाव 'प्रभास 20' असल्याचे कळतेय. याशिवाय एका हिंदी सिनेमातही तिची वर्णी लागली आहे. तूर्तास या हिंदी सिनेमाचे नाव गुलदस्त्यात आहे.


भाग्यश्रीने एका ताज्या मुलाखतीत ही माहिती दिली. माझी नवी इनिंग सुरु होतेय. आगामी प्रत्येक सिनेमात माझा एक नवा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या प्रत्येक चित्रपटातून मला वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने मी जाम आनंदात आहे. एखाद्या नवख्या कलाकारासारखी ही भावना आहे, असे ती म्हणाली.1989 साली 'मैंने प्यार किया' या सिनेमाद्वारे भाग्यश्रीने बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात भाग्यश्रीने रंगवलेली सुंदर, सौज्वळ सुमन प्रेक्षकांना भावली होती.


चित्रपटातील तिच्या अभिनयाचेही खूप कौतुकही झाले. पण अचानक भाग्यश्रीने लग्नाचा निर्णय घेतला आणि 'सुमन'च्या करिअरला ब्रेक लागला. विवाहबंधनात अडकल्यानंतर तिने तीन चित्रपट केलेत आणि यानंतर, अभिनयातून ब्रेक घेतला. नाही म्हणायला 2001 साली तिने पुन्हा कमबॅक केले. पण छोट्या-मोठ्या भूमिकांपलीकडे तिच्या वाट्याला काहीच आले नाही. भाग्यश्रीचा अभिनय पुन्हा एकदा पाहायला मिळणार असल्याने चाहते मात्र खूष आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या