तब्बल ५२ वर्षांनंतर लीप डे ला भारत-न्यूझीलंड सामना...

Image may contain: 1 person, beard and outdoor
क्राईस्टचर्च, ता. २९ फेब्रुवारी २०२० : आजपासून हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु झाला आहे.हा सामना आज सुरु झाल्याने खास ठरला आहे.कारण आज लीप डे म्हणजेच २९ फेब्रुवारी आहे.दर ४ वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षात फेब्रुवारीचा महिना २९ दिवसांचा असतो.त्यामुळे लीप डेला सुरु झालेला भारत-न्यूझीलंड हा क्रिकेट इतिहासातील ५ वा कसोटी सामना ठरला आहे.याआधी शेवटचा दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात चितगाव या २००८ ला २९ फेब्रुवारीला कसोटी सामना सुरु झाला होता.तर क्रिकेट इतिहासामध्ये लीप डेला सर्वात पहिल्यांदा न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आणि वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी सामने सुरु झाले होते.हे दोन्ही कसोटी सामने २९ फेब्रुवारी १९६८ ला सुरु झाले होते.त्यावेळी न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील सामना वेलिंग्टनला झाला होता.तर वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड संघातील सामना ब्रिजटाऊनला झाला होता.त्यानंतर आता तब्बल ५२ वर्षांनी भारत आणि न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा लीप डेला (आज) कसोटी सामना सुरु झाला आहे.


विशेष म्हणजे १९६८ ला २९ फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला होता.त्यामुळे याच इतिहासाची भारतीय संघ ५२ वर्षांनी पुनरावृत्ती करणार का हे पहावे लागेल.तसेच या कालावधी दरम्यान १९८० ला देखील लीप डेच्या दिवशी ऑकलंड येथे न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कसोटी सामना सुरु झाला होता.आजपासून सुरु झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध भारत कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात बिनबाद ६३ धावा केल्या आहेत.तत्पूर्वी भारताचा पहिला डाव २४२ धावांवर संपुष्टात आला आहे.

२९ फेब्रुवारीला सुरु झालेले कसोटी सामने

न्यूझीलंड विरुद्ध भारत - वेलिंग्टन, १९६८ (भारत विजयी)

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड - ब्रिजटाऊन, १९६८  (अनिर्णित)

न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज - ऑकलंड, १९८० (अनिर्णित)

दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश - चितगाव, २००८  (दक्षिण आफ्रिका विजयी)

न्यूझीलंड विरुद्ध भारत - क्राईस्टचर्च, २०२० (?)


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या