पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला कंत्राटी सलाइन...

Image may contain: sky and outdoor
पुणे, ता. २ मार्च २०२० (प्रतिनिधी): स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुणे महापालिकेचा आरोग्य विभागाच गेल्या काही वर्षांपासून 'कंत्राटी सलाइन'वर आहे.पालिकेच्या मालकीच्या १ सर्वसाधारण रुग्णालय (कमला नेहरू हॉस्पिटल),१ सांसर्गिक रुग्णालय (नायडू हॉस्पिटल),४७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १८ प्रसूतिगृहे यांचा कारभार ज्या आरोग्य खात्याच्या अधिपत्त्याखाली आहे.त्या आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिक्षकासह न्युरोसर्जन,कॉर्डिओलॉजिस्ट यांसह विविध आजारांवरील तज्ज्ञ अशी १४४ पदे रिक्त आहेत.त्यातच उपलब्ध कर्मचारी बळाचा विचारही न करता गेल्या काही वर्षांत विविध ठिकाणी हॉस्पिटलसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन रिकाम्या वास्तूंची भर घालण्याचा कारभार सुरू आहे.


स्वत:ची आरोग्य सेवा सक्षम करण्याऐवजी 'शहरी गरीब योजने'द्वारे कोट्यावधी रुपयांचा मलिदा खासगी हॉस्पिटलला अदा करून,स्वत:ची यंत्रणाच खिळखिळी करण्याचा उद्योग आरोग्य खात्याकडून सुरू आहे.याकडे पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी आजपर्यंत गांभीर्याने पाहत नाही.याचे उत्तम उदाहरण म्हणजे गाडीखाना येथील'पालिकेच्या मालकीचे बंद पडलेले एक्स-रे मशिन' हे होय.पालिकेच्या सन २०१९-२० या चालू आर्थिक वर्षात आरोग्य विभागासाठी तब्बल २२५ कोटी रुपयांची तरतूद व वर्गीकरणातूनही उपलब्ध होणारा निधी असतानाही,याच आरोग्य विभागाने बंद पडलेल्या एक्स-रे मशिनच्या जागी नवी मशिन खरेदी करण्यास रस दाखविलेला नाही.उलट कार्यरत जागांमध्ये १ क्ष-किरण तज्ज्ञ असतानाही,स्वत:च्याच मालकीच्या अन्य ३ एक्स-रे मशिन खासगी संस्थेला चालविण्यास दिल्या आहेत.

महापािलकेच्या आरोग्य विभागाच्या ६५ रुग्णालयांपैकी एकाही ठिकाणी अतिदक्षता विभागाची सुविधा नाही. तसेच आजारांचे निदान करण्यासाठी रक्त, शर्करा, लघवी, थुंकी आदींच्या चाचण्या करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब नाहीत़ याची स्पष्टोक्ती खुद्द महापालिकेच्या सन २०२०-२१ च्या अंदाजपत्रकातही देण्यात आली आहे.पालिकेच्या आरोग्य खात्यास वर्ग एककरिता एकूण मान्य पदसंख्या १५१ इतकी असली तरी,सद्यस्थितीला केवळ ७ पदांवर आरोग्य विभाचा डोलारा उभा आहे.नव्याने ३० डॉक्टर व काही तज्ज्ञ मिळविण्यास पालिकेला यश आले असले तरी ते हंगामी आहेत.आरोग्य विभागाच्या ३५ वैद्यकीय विभागातील जी सात पदे भरली आहेत.त्यामध्ये एक क्ष-किरण तज्ज्ञ (बंद पडलेल्या एक्स रे मशिन येथील),२ जनरल सर्जन,२ पॅथालॉजिस्ट (पालिकेच्या लॅब नाहीत), १ मायक्रोबायोलॉजिस्टसह एक मेडिकल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे.

गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ ही पदे रिक्त असल्याने शासनाकडे पाठपुरावा करूनही रिक्त पदे भरली न गेल्याने,पालिकेने आपल्या अनेक सुविधा कंत्राटी पद्धतीने खासगी संस्थांच्या माध्यमातून रुग्णांना देण्याचा सपाटा लावला आहे.याचा मोठा बोजा हा आरोग्य विभागाच्या आर्थिक समीकरणांवर पडत असून,आरोग्य संबंधित सुविधांसाठी पालिका या खासगी लॅबला मात्र लाखो रुपयांचा मलिदा अदा करण्यातच स्वारस्य मानत आहे.पालिकेच्या आरोग्य विभागातील विविध पदे भरण्याबाबत शासनाकडे अनेक वर्षे पाठपुरावा सुरू आहे.मात्र नव्याने भरती बंद असल्याने ही पदे भरली गेली नाहीत.सद्यस्थितीला नगर विकास खात्यात विविध पदे भरण्याबाबत अनुकूलता असल्याने लवकरच ही पदे भरली जातील.याबाबत महापालिकेकडून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.


आरोग्य विभागाकडून रिक्त पदे न भरता,आपला कारभार खासगी संस्थांच्या कंत्राटी पद्धतीवर चालू ठेवत आहे.या कंत्राटदारांवर वचक ठेवणारी यंत्रणाही आरोग्य विभागाकडे नाही.आरोग्य विभागासाठी पालिका स्वत: पैसे खर्च करून विविध साधनसामग्री व पायाभूत सुविधा उभी करीत आहे.मात्र त्या सोयी-सुविधा खासगी संस्थांना कंत्राटी पद्धतीवर चालविण्यास देऊन,नागरिकांचा कररूपी कोट्यावधी रुपयांतून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा कार्यक्रम पालिकेचा आरोग्य विभाग करीत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या