कोहलीसह अन्य ३ खेळाडू अतिक्रिकेटला कंटाळले...

Image may contain: 1 person, playing a sport
पुणे, ता. २ मार्च २०२० (प्रतिनिधी): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) हाव काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने व्यस्त वेळापत्रक आणि अतिक्रिकेटला कर्णधार विराट कोहलीसह अन्य ३ खेळाडू कंटाळले असून लवकरच क्रिकेटच्या टी-२०,एकदिवसीय तसेच कसोटी यांपैकी एका प्रकारातून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहेत.मंडळाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.२०१८ सालापासून भारतीय संघ सातत्याने सामने खेळत आहे.माजी न्यायमूर्ती लोढा यांच्या समितीने २ मालिकांमध्ये किमान १५ दिवसांची विश्रांती मिळावी असे आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले होते. सुरुवातीला काही दिवस मंडळाने त्यानुसार सामने आयोजित केले होते.आता मात्र नव्याचे ९ दिवस या उक्‍तीप्रमाणे पुन्हा एकदा खेळाडूंना घाण्याला जुंपल्यासारखे सामने खेळविले जात आहेत.
 काही मालिकांमधून कर्णधार कोहली तसेच उपकर्णधार रोहित शर्मा यांनी विश्रांती घेतली होती.सध्या भारतीय संघात प्रत्येक जागेसाठी प्रचंड स्पर्धा आहे.त्यामुळे आपण विश्रांती घेतली व अन्य खेळाडू यशस्वी ठरला तर आपली संघातील जागा जाईल या भीतीने खेळाडू दुखापती लपवून खेळत आहेत हे देखील समोर आले आहे.याच अतिक्रिकेटचा फटका खेळाडूंना बसतो.एकीकडे सरस कामगिरी करण्याचे दडपण व दुसरीकडे तंदुरुस्तीसाठी करावी लागणारी मेहनत यांच्यात आता खेळाडू फसले आहेत.२०२१ साली होणाऱ्या टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर क्रिकेटच्या एका प्रकारातून निवृत्ती घेण्याचे संकेत कोहलीने काही दिवसांपूर्वीच दिले होते.केवळ कोहलीच नव्हे तर रोहित शर्मा,वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या हे देखील क्रिकेटच्या एका प्रकारातून निवृत्त होण्याची शक्‍यता या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

रोहितने गतवर्षी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत विश्रांती घेतली होती.सततच्या सामन्यांमुळे खेळावरही परिणाम झाल्याचे अनेक खेळाडू अनधिकृतरीत्या सांगत असतात.गेली २ वर्षे मंडळाने त्याकडे सातत्याने कानाडोळा केला आहे.विविध प्रायोजक तसेच मुख्य प्रायोजकांकडून मिळणारा प्रचंड पैसा मंडळाला सोडवत नाही त्यामुळेच सामन्यांची संख्या वाढत आहे.सरासरीचा विचार केला तर भारतीय संघ जागतिक क्रिकेटमध्ये सध्या सर्वात जास्त व्यस्त आहे.काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हे संघ जास्त सामने खेळत होते.भारतीय संघ सर्वसाधारणपणे दरवर्षी ४ ते ५ कसोटी,३० एकदिवसीय सामने तर टी-२० चे ३ ते ५ सामने खेळत होता.


गेल्या २ वर्षांपासून त्यात भरपूर वाढ झाली आहे.या अतिक्रिकेटचा फटका बसल्याने पंड्या,बुमराह व भुवनेश्‍वर कुमार यांना दुखापतींचा सामना करावा लागला होता व विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर त्यांना संघातील स्थान गमवावे लागले होते.अष्टपैलू खेळाडू पंड्याने दुखापतीमुळे अद्याप संघाबाहेर आहे.बुमराहलाही संघातून बाहेर जावे लागले होते.दुखापतीतून सावरत त्याने न्यूझीलंड दौऱ्यात संघात स्थान मिळविले.संघाच्या वेगवान गोलंदाजीचा प्रमुख भार त्यालाच सांभाळावा लागत आहे.त्यामुळे आगामी काळात क्रिकेटच्या एका प्रकारातून तो निवृत्ती जाहीर करण्याची शक्‍यता वाढली आहे. टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांतून नव्हे तर बुमराह,पंड्या हे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतील असेही सांगितले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या