गरीब गरजू लोक चाखणार पुरण पोळीचा स्वाद...

Image may contain: food
पिंपरी, ता. ४ मार्च २०२० (प्रतिनिधी): होळीत नैवेद्याची पुरणपोळी टाकण्याची प्रथा आहे.त्याऐवजी हीच पुरणपोळी दान केली तर गरीब आणि गरजू लोकांना पुरणपोळीचा स्वाद चाखता येणार आहे.पिंपरी चिंचवड येथील रॉबीनहूड आर्मी या संस्थेतर्फे गेल्या ३ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे.यंदाही होळीनिमित्त येत्या सोमवारी (दि. ९) हा उपक्रम संस्थेकडून घेतला जाणार आहे.त्यासाठी पुरणपोळीचे दान करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.वसंत ऋतूच्या आगमनालाच होळी हा सण येतो.


भारतीय प्रथा-परंपरेनुसार होळीनिमित्त नैवेद्याची पुरणपोळी टाकण्याची प्रथा आहे.हीच पुरणपोळी दान केली तर गरिबांना पुरणपोळीचा स्वाद चाखण्याचा आनंद घेता येणार आहे.ही संकल्पना घेऊन २०१८ पासून रॉबीनहूड आर्मीकडून पुरणपोळीचे दान स्वीकारली जात आहे.या उपक्रमात पहिल्या वर्षी १ हजार २०० तर,गेल्या वर्षी साडेतीन हजार पुरणपोळ्या मिळाल्या होत्या.शहरातील झोपडपट्टी,कामगार वस्तीच्या ठिकाणी पुरणपोळ्यांचे वाटप करण्यात येते.काळेवाडी, रहाटणी, पिंपरी, चिंचवड, वल्लभनगर आदी भागांतून पुरणपोळ्यांचे यापूर्वी झालेल्या उपक्रमांमध्ये संकलन करण्यात आले होते.

नागरिकांनी होळी दहन करताना सोबत एक बॉक्‍स ठेवून त्यामध्ये पुरणपोळ्या जमा कराव्या.तसेच,संस्थेच्या स्वयंसेवकांना त्याबाबत कळवावे.स्वयंसेवक स्वतः हजर होऊन या पुरणपोळ्या जमा करतील.होळीच्या दिवशी रात्री गरजू आणि गरीब नागरिकांना त्याचे वाटप करण्यात येणार आहे.पुरणपोळी दानाच्या उपक्रमासाठी आवश्‍यक सहकार्य करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.होळीनिमित्त गरजू व गरीब नागरिकांसाठी आम्ही पुरणपोळी संकलित करणार आहोत.


प्रत्येक घरातून जरी एक पुरणपोळी दान स्वरूपात मिळाली तरी गरिबांना पुरणपोळीचा आस्वाद घेता येणार आहे.आम्ही सध्या काही सोसायट्यांमध्ये त्यासाठी संपर्क साधतो आहे.नागरिकांनी होळी दहनाच्या वेळी सोबत एक बॉक्‍स ठेवून पुरणपोळ्या जमा कराव्या.आमचे स्वयंसेवक त्या पुरणपोळ्या गोळा करून त्याच रात्री गरीब व गरजू नागरिकांना त्याचे वाटप करणार आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या