अशोक पवार, बाबूराव पाचर्णे मंचावर एकत्र आले पण...

Image may contain: 2 people
शिरूर, ता. 11 मार्च 2020 : विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल पाच महिन्यानंतर न्हावरे (ता. शिरूर) येथे माजी आमदार बाबूराव पाचर्णे आणि आमदार अशोक पवार एकाच मंचावर आले होते. पण, दोघांनी एकमेकांविषयी कोणतेही वक्तव्य केले नाही. दोघे एका व्यासपीठावर आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.आमदार निधी तसेच जिल्हा परिषद निधीतील विविध विकास कामांच्या उद्‌घाटन व भूमीपुजन कार्यक्रमाच्या निमीत्ताने पवार व पाचर्णे हे आजी - माजी आमदार एका व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमात आपापल्या नेत्याच्या बाजूने राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीही गर्दी होती. प्रत्यक्षात, या कार्यक्रमात ऍड. अशोक पवार व बाबूराव पाचर्णे यांनी एकमेकांविषयी कुठलेही "आक्षेपार्ह' विधान न करता समयोचित भाषणे करून वेळ मारून नेली. सुरवातीला सर्वांचे स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आले. त्यावेळी विद्यमान आमदार म्हणून ऍड. पवार यांचे नाव सुरवातीला सत्कारासाठी पुकारताच, त्यांनी ज्येष्ठत्वाचा मान देत अगोदर पाचर्णे यांचा सत्कार करण्यास सुचविले. ऍड. पवार यांच्या या "बॉडी लॅंग्वेज' मुळे कार्यक्रमातील ताण हलका झाला व पुढेही खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.


विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकमेकांचे तोंड देखील पाहणे टाळत असलेले पवार व पाचर्णे हे तब्बल पाच महिन्यानंतर एकाच स्टेजवर आल्याने राजकीय पटलावर या एकीकरणाची मोठी उत्सुकता होती. पत्रकार परिषदा व जाहीर भाषणांतून एकमेकांची उणीदुणी काढताना आणि टीकाटिपण्णी करताना या दोन्हीही नेत्यांनी शेलक्‍या शैलीचा स्वैर वापर केला होता. त्यामुळे या कार्यक्रमातही चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगेल अशी न्हावरेकरांबरोबरच; पंचक्रोशीत उत्सुकता होती. ही जुगलबंदी अनुभवण्यासाठी राजकीय जाणकारांबरोबरच, हौशी तरूणांनी कार्यक्रमाला मुद्दामहून हजेरी लावली होती.


या कार्यक्रमात दोन दिग्गज एकत्र येत असल्याने उत्सूकता होती. शिरूरच्या राजकीय पटलावरील एकमेकांचे राजकीय हाडवैरी समजल्या जाणाऱ्या पवार व पाचर्णे यांच्यातील जुगलबंदी आणि आरोप-प्रत्यारोपांतून रंगणारा राजकीय संघर्ष अनुभवण्यासाठी आलेल्यांचा मात्र हिरमोड झाल्याची चर्चा रंगली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या