मंगलदास बांदल यांची खंडणीप्रकरणी होणार चौकशी...

पुणे, ता. 13 मार्च 2020 (PoliceKaka): पुणे शहरातील एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल 50 कोटी रुपयांची खंडणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलविणार असल्याचे सांगण्यात आले.


खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत. आशिष पवार (वय 27, रा. लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, सहकारनगर), रूपेश ज्ञानोबा चौधरी (वय 45, पाटे संस्कृती, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर), रमेश रामचंद्र पवार (वय 32, रा. प्रेमनगर, मार्केट यार्ड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणाऱ्या 42 वर्षीय सराफी व्यावसायिकाने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शहरातील नामांकित सराफी व्यावसायिक आहेत. आशिष पवार हा त्यांच्या दुकानामध्ये यापूर्वी बॉडीगार्ड म्हणून काम करीत होता. रमेश पवार हा घरकाम करणारा कामगार आहे, तर चौधरी हा सामाजिक कार्यकर्ता आहे.खंडणीचा प्रकार घडण्यापूर्वी काही दिवासांपूर्वी बांदल हे संबंधित सराफाला भेटले होते. तसेच चौधरीची आपली चांगली ओळख आहे. तसेच माझी सारी कामे तोच पाहतो, असेही बांदल यांनी सांगितल्याचे सराफाने फिर्यादित म्हटले आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आशिष पवार व चौधरी यांनी संगनमत करून, रमेश पवार याला हाताशी धरून त्याच्या मदतीने फिर्यादीची व्हिडिओ क्‍लिप तयार केली. ही क्‍लिप फिर्यादी यांना दाखवून ती सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीकडे 50 कोटी रुपयांची मागणी केली. केवळ तेवढ्यावरच न थांबता आशिष पवार याने त्याच्याकडील पिस्तूल दोन वेळा धाक दाखवून पोलिसांकडे वाच्यता केल्यास पिस्तुलातून गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकाराबाबात पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'याबाबत माहिती घेण्यासाठी बांदल यांना आम्ही चौकशीसाठी बोलविणार आहोत. त्यांचा या गुन्ह्याशी काही थेट संबंध आहे का, हे त्यांच्याशी बोलल्यानंतर आणि काही पुरावे पुढे आल्यानंतर कळू शकेल. याबाबत बांदल यांची बाजू समजावून घेण्यासाठी संपर्क साधला असता तो झाला नाही.' असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या