महावितरणच्या या विभागात २७१ सौर कृषिपंप कार्यान्वित...

Image may contain: 3 people, people standing, sky, grass, cloud, plant, outdoor and nature
बारामती, ता. १३ मार्च २०२० (प्रतिनिधी): महावितरणच्या बारामती, केडगाव व सासवड विभागात मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमधून आतापर्यंत २७१ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.या सौर कृषिपंपांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला असून त्यांची वीजबिलातून देखील मुक्तता झाली आहे.बारामती ग्रामीण मंडलमधील बारामती व इंदापूर (बारामती विभाग), शिरूर व दौंड (केडगाव विभाग) तसेच पुरंदर व भोर (सासवड विभाग) तालुक्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या निकषानुसार पहिल्या टप्प्यात आतापर्यंत १३२२ शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले आहे.त्यातील १२९ शेतकऱ्यांनी कोटेशनच्या रकमेचा भरणा केला आहे.शेतकऱ्यांनी निवडलेल्या एजन्सीजना महावितरणकडून वर्क आर्डर देण्यात येत आहे.आतापर्यंत ३ HP क्षमतेचे २३९ आणि ५ HP क्षमतेचे ३२ असे एकूण २७१ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहे.

कृषिपंपांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यासाठी ६३ केव्ही किंवा १०० केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र उभारण्यात येतात व त्यावरील लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो.मात्र, वीजचोरी, इतर तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यासारख्या अडचणी येतात.दुर्गम व डोंगराळ भागात वीज यंत्रणेचे जाळे नसलेल्या भागात डिझेल इंधनाचा वापर करून कृषिपंप चालविले जातात.या सर्वांसाठी पर्याय म्हणून दिवसा तसेच शाश्वत व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी सौर कृषिपंप योजनेची अंमलबजावणी सुरु आहे.


शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे व यापूर्वी कृषिपंपासाठी वीजजोडणी घेतलेली नाही किंवा शुल्क भरूनही वीजजोडणी प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून सौर कृषिपंप देण्यात येत आहेत.यामध्ये सोलर पॅनेल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे व इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे. ३ किंवा ५ HP क्षषमतेच्या सौर पंपाद्वारे विहीर, नदी, शेततळे, कालव्यामधून पाण्याचा उपसा करून पाईपद्वारे पिकांना पाणी देता येते.

सौर कृषिपंपाला कोणत्याही इंधन वा पारंपरिक विजेची आवश्यकता नाही.त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणे, कमी-अधिक दाब, सिंगल फेज समस्या, पंप जळणे या समस्याही उद्‌भवत नाही.महत्वाचे म्हणजे सुमारे २५ वर्ष सेवा देऊ शकणाऱ्या सौर कृषिपंपाचा देखभाल खर्च अत्यंत कमी आहे.तसेच शेतकऱ्यांची वीजबिलांपासून सुद्धा मुक्तता होणार आहे. ३ ते ५ HP क्षमतेच्या सौर कृषिपंप योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी १० टक्के आणि अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गासाठी ५ टक्के रक्कम लाभार्थी हिस्सा आहे.


मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करण्यासाठी विनाव्यत्यय वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीजबिलांचा किंवा डिझेलचा खर्च नाही.कमीतकमी व साध्या देखभालीची गरज आहे.विद्युत अपघात होण्याची शक्यता नाही.पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.याशिवाय बॅटरी चार्जिंगची सोय असल्याने बॅटरीद्वारे शेतामधील घराला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.सौर कृषिपंपाच्या देखभाल व दुरूस्तीसाठी ५ वर्ष तर सौर पॅनलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी राहणार आहे.या हमी कालावधीत सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरूस्त झाल्यास विनामुल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधीत एजन्सीची राहणार आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या