शिरुर तालुक्‍यातील गावगाड्यांची दोरी महिलांच्या हाती...

Image may contain: house, text that says 'ग्रामपंचायत'
केंदूर, ता. १८ मार्च २०२० (प्रतिनिधी): शिरूर तालुक्‍याच्या मार्च २०२० ते मार्च २०२५ या कालावधीमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत कार्यक्रम (दि. २७) रोजी होणार आहे.त्यामुळे सर्वच गावच्या गावपुढाऱ्यांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे.शिरुर तालुक्‍यातील मार्च २०२० ते मार्च २०२५ दरम्यान तब्बल ९३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.त्याच पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील १३ तालुक्‍यांमध्ये तब्बल १ हजार २८६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडत काढण्यासाठी जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्र व बिगर अनुसूचित क्षेत्रामधील ग्रामपंचायतीतील सरपंच पदे अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व स्त्रियांसाठी जागा आरक्षित करण्यासाठी तहसीलदार यांना कळविले आहे.

शिरूर तालुक्‍यातील एकूण ९३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत होणार आहे.अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ४ तर पुरुषांसाठी ४ जागा आरक्षित आहेत.अनुसूचित जमातीच्या २  महिला व १ पुरुषासाठी, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या १३ महिला व १२ पुरुषांसाठी जागा आरक्षित ठेवल्या आहेत.सर्वसाधारणमध्ये तब्बल २९ महिला आणि २८ पुरुषांसाठी जागा आरक्षित आहेत.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

९३ ग्रामपंचायतीमधील ४८ गावचा गावगाडा महिला हाकणार आहेत.तर ४५ ग्रामपंचायतीचे कारभारी पुरुष असतील.त्यामुळे सरपंचपदाची संधी नक्‍की कोणाला मिळणार? गावात कोणाचे पारडे जड जाणार? महिलेसाठी आरक्षित जागा आली तर आपल्या पॅनलमधून कोण महिला उमेदवार असणार? पुरुषासाठी जागा आरक्षित झाली तर कोण रणशिंग फुंकणार? याची धाकधूक गावपुढाऱ्यांना लागून राहिली आहे.

त्याचबरोबर, आरक्षण निश्‍चित करतेवेळी यापूर्वीच्या निवडणुकांसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीच्या विचार करून सरपंच पद प्रवर्गनिहाय आलटून-पालटून नेमून देण्यात येणार आहे.यापूर्वीचे आरक्षण पुन्हा येणार नसल्यामुळे अनेकजण तर्कवितर्क लावत आहेत.मात्र, कोणत्या गावचा सरपंच कोणत्या आरक्षित जागेचा असेल याची खात्री २७ मार्चलाच होणार असल्याने सगळ्यांनाच त्याची वाट पाहावी लागणार आहे.शिरुर तालुक्‍यात नव्याने ३ ग्रामपंचायत स्थापित झाल्या आहेत.त्यामध्ये मूळ टाकळी हाजी ग्रामपंचायत मधून विभाजन होऊन नव्याने माळवाडी आणि म्हसे बुद्रुक या २ तर मूळ जांबूत ग्रामपंचायतमधून विभाजन होऊन शरदवाडी ही १ अशा एकूण ३ ग्रामपंचायत नव्याने स्थापन झाल्या आहेत.मात्र, या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत जिल्हास्तरावरील आढावा घेऊन त्यांचे स्वतंत्र आरक्षणाबाबत कळविण्यात येणार आहे.


सणसवाडी, पाबळ, न्हावरे, तळेगाव ढमढेरे, केंदूर, जांबुत, शिक्रापूर, करंदी, कारेगाव, कवठे यमाई, वडगाव रासाई, कोरेगाव भीमा, पिंपळे जगताप आणि टाकळी हाजी या तालुक्‍यातील आर्थिकदृष्ट्या सधन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाकडे सर्व तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या