Video: लॉक डाऊन, संचारबंदी म्हणजे नेमकं काय?

शिरूर, 24 मार्च 2020 (PoliceKaka): जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे तो नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रभावी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. 23) घेतलेल्या पत्रकार परिषेदत कोरोनला रोखण्यासाठी राज्यात कलम 144 सोमवारपासून लागू होणार असल्याची घोषणा केली.

महाराष्ट्रातील कोणत्याही भागात 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. सध्या 31 मार्चपर्यंत मुख्यमंत्र्यांनी लॉक डाऊन असणार आहे, अशी घोषणा केली आहे.संचार बंदी म्हणजे नेमकं काय?
संचारबंदी कायदा राज्यात सर्वत्र लागू करण्यात आला असून संचारबंदी म्हणजे नेमकं काय, जनतेनं काय करावं याबाबत सविस्तर माहिती देत आहेत नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील.

लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय?
लॉक डाऊन ही आपत्कालीन प्रणाली आहे, जी एखाद्या साथीच्या किंवा आपत्तीच्या वेळी अधिकृतपणे शहरात लागू केली जातात. कोरोनामुळे सध्या चीन, इटली, स्पेन या देशांमध्येही लॉक डाऊन करण्यात आला आहे. चीनमधील परिस्थिती लॉक डाऊननंतरच सुधारली त्यामुळे राज्यात कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी नागरिकांना घरात राहणे बंधनकारक आहे. लॉक डाऊनमध्ये लोकांना घरे सोडण्याची परवानगी नसणार. तसेच, 5 पेक्षा जास्त लोकं एका ठिकाणी जमू शकणार नाही. लोकांना केवळ औषध, अन्नधान्य अशा आवश्यक गोष्टींसाठी बाहेर येण्याची परवानगी असणार आहे.


का केलं जात लॉक डाऊन

लॉक डाऊन ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागू केली जाते. समाजात किंवा शहरात राहणाऱ्या स्थानिक लोकांना आरोग्यापासून किंवा इतर जोखमीपासून संरक्षित करण्यासाठी लॉक डाऊन केले जाते. कोरोनाचा प्रसार सध्या भारतात वेगाने होत आहेत. यात महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे. याआधी राजस्थानमध्ये लॉक डाऊन घोषित करण्यात आला होता. त्याच धर्तीवर महाराष्ट्राने हा निर्णय घेतला आहे.

लोकल ट्रेन बंद
कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. लोकल पूर्णपणे बंद न करता यामध्ये ओळखपत्र दाखवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कामगारांना प्रवेश दिला जाणार होता. मात्र आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशभरातील लोकल आणि रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलही 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 97 वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका टाळ्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन करूनही लोक काही काम नसताना देखील घराबाहेर निघत होते. त्यांनतर, सोमवारी ५ वाजता उद्धव ठाकरेंनी राज्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले. संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी ३१ मार्चपर्यंत असणार आहे. परंतु संचारबंदीच्या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. संचारबंदीच्या या काळात नेमकं काय काय सुरु राहणार आणि काय काय बंद राहणार हे जाणून घ्या.


काय काय सुरु राहणार-
 • जीवनावश्यक वस्तूंची दुकानं
 • औषधांची दुकानं
 • दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
 • दवाखाने, रुग्णालयं
 • किराणाची दुकानं
 • रेल्वेतील मालवाहतूक
 • बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था
 • वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा यांसारखी अत्यावश्यक कार्यालयं
 • रिक्षा, टॅक्सी सुरु (प्रवाशांची संख्या मर्यादित)
 • कृषीमालाशी सबंधित वाहतूक
काय काय बंद राहणार-
 • मुंबईची लोकलसेवा
 • जिल्ह्यांच्या सीमा
 • राज्यातील सीमा
 • नागरिकांचा प्रवास
 • शाळा, महाविद्यालयं
 • मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह
 • धार्मिक प्रार्थना स्थळे
 • खासगी वाहने (अत्यावश्यक कारणांसाठी सुरू राहतील)
 • परदेशातून येणारी वाहतूक


दरम्यान, याआधी कोरोनाचे १५ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर पोहोचली होती. मात्र त्यात सोमवारी आणखी ८ जणांची भर पडली. या आठ जणांमध्ये सांगलीच्या ४, मुंबईच्या ३ आणि साताऱ्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९७ वर पोहोचली आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या