नागरिकांना गावबंदी कराल तर होणार गुन्हा दाखल...

रायगड, ता. 27 मार्च 2020 (PoliceKaka): जिल्ह्यात कोरोनाच्या भीतीने गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीस बंदी घालणाऱ्या सरपंच, पोलिस पाटील यांच्यावर आता कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिले आहेत.

याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी याना माहिती दिली असून, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनाही ग्रामपंचायतींना सूचना देण्याचे सांगितले आहे. शिवाय, गावात अशी कोणास गावबंदी केली असल्यास 100 या हेल्प नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले आहे.


कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून गावातील नागरिक हे घाबरू लागले आहेत. शासनाने सगळीकडे संचारबंदी केली असून, जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आलेले आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना या विषाणूची लागण होत आहे. मुंबई, पुणे या शहरात विषाणूचे बाधित रोज वाढत आहेत. परदेशातून, मुंबई, पुणे येथील चाकरमानी हे पुन्हा गावाकडे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


कोरोनाची लागण ही गावात होऊ नये या दृष्टीने जिल्ह्यातील अनेक गावांनी गावच्या वेशीवर बॅरिगेट्स, कुंपण, खड्डे मारून बंद केल्या आहेत. तर काहीजण गावाच्या वेशीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करून प्रवेश देत आहेत. मात्र जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत हद्दीत केलेली ही गावबंदी चुकीची आहे. गावात येण्यास बंदी करणाऱ्या सरपंच, पोलिस पाटील यांच्यावर पहिली कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिली आहे. गुन्हा दाखल करूनही हा प्रकार थांबला नाही तर संबंधितांना जेलची हवा खावी लागेल.
तर असे प्रकार कुठे घडत असतील तर पोलिसांच्या 100 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले आहे. त्यामुळे गाववाल्यानोगावात येणाऱ्या नागरिकांना गावबंदी केलीत तर सरपंच, पोलिस पाटील यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. हे मात्र नक्की.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर राज्यातील विविध गावांनी रस्ते बंद केले आहेत. संबंधित छायाचित्रे सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. रायगड जिल्ह्याप्रमाणेच इतर जिल्ह्यांनीही आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या