शिरूरमध्ये जनता कर्फ्यू; कर्फ्यूचे वेळापत्रक पाहा...

शिरूर, ता. 1 एप्रिल 2020 (PoliceKaka): शिरूर शहरात करोना व्हायरस संसर्ग होऊ नये म्हणून आजपासून (बुधवार)   जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आव्हानही शिरूरचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले. या काळात शहरात पुन्हा एकदा जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे.


शिरूर शहरातील पोलिसांच्या वतीने शहरात येणाऱ्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. यामुळे शिरूर शहरात श्रीगोंदा, पारनेर व पंचक्रोशीतील नागरिकांना येण्यास बंदी घातली आहे. शिरूर नगरपरिषदेच्या वतीने कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांकडे कोणी पुणे, मुंबई, इतर राज्यातून, शहरातून, परदेशातून पाहुणे आले का याची माहिती गोळा करीत आहेत.शिरूर पोलीस प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. बीजे कॉर्नर, तर्डोबाचीवाडी रोड, सीटी बोरा रोड, बाबुरावनगरकडे जाणारा पूल, पाबळ फाटा, रामलिंग रोड, काचेआळी, शिरूर बायपास बगाड रोड (पोदार स्कूल रोड) या शहरात येणाऱ्या प्रमुख सीमा आज पोलिसांनी बंद केल्या आहेत. शिरूर शहरात नागरिकांकडे कोणी बाहेरचे पाहुणे आले असतील तर त्यांची माहिती नगरपरिषद कर्मचाऱ्यांना द्यावी. माहिती लपवली व एखादा करोना व्हायरस रुग्ण आढळला यामुळे तुमचे आरोग्य धोक्‍यात आणि शहराचे आरोग्य धोक्‍यात येईल. ही माहिती लपवल्या बद्दल तुमच्यावर गंभीर गुन्हा दाखल होणार आहे. असे महेश रोकडे यांनी सांगितले.


अत्यावश्‍यक सेवेसाठी घराबाहेर पडणारे नागरिक व मालवाहतूक करणारे नागरिकांनी शिरूर शहरात प्रवेश करताना व शहरातून बाहेर जाताना (सतरा कमान पूल) नगर-पुणे रोडचा वापर करावा व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी केले आहे.


"जनता कर्फ्यू'बाबत पंचायत समितीचे नियोजन
शिरूर तालुक्‍यात जिल्हा परिषद गटनिहाय "जनता कर्फ्यू'बाबत पंचायत समितीने नियोजन केले असून, येत्या शुक्रवारपासून (ता. 3 एप्रिल) विविध गावांत शंभर टक्के लॉकडाऊन केले जाणार असल्याचे गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील यांनी सांगितले. गावांत व परिसरात कडकडीत बंद पाळल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो. याबाबत इतरत्र झालेले प्रयोग यशस्वी ठरले आहेत. या कालावधीत गावपातळीवर जंतुनाशकाची फवारणी करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या असून, ग्रामस्थांच्या सहकार्यातून स्वच्छता मोहीमही राबविली जाणार असल्याची माहिती ढवळे पाटील यांनी दिली.


जनता कर्फ्यूचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे ः शुक्रवार (ता. 3) ः शिरूर ग्रामीण- न्हावरे गट (16 गावे), शनिवार (ता. 4) ः वडगाव रासाई- मांडवगण फराटा गट (14 गावे), सोमवार (ता. 6) ः रांजणगाव सांडस- तळेगाव ढमढेरे गट (14 गावे), मंगळवार (ता. 7) ः टाकळी हाजी- कवठे येमाई गट (17 गावे), बुधवारी (ता. 8) कारेगाव- रांजणगाव गणपती गट (16 गावे).

तळेगावात १०० टक्के बंदचा निर्णय...
तळेगाव ढमढेरे येथील बाजारपेठेतील सर्व दुकाने ४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ग्राम समितीने घेतला असल्याचे तलाठी डी. एस. भराटे व ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांनी सांगितले.  ग्रामपंचायतीने गावठाणासह सर्व वाडीवस्तीवर जंतूनाशक फवारणी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या