Video: कोरोनाशी लढणारे लढवय्ये दांपत्य व्हायरल....


शिरूर, ता. 4 एप्रिल 2020 (सतीश केदारी-पोलिसकाका):
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लॉकडाऊननंतर नागरिकांची जबाबदारी प्रशासनावर येऊन पडली. पण, प्रशासनामध्ये कुटुंबातील दोघेही उच्च पदावर असतील तर त्यांच्यावर किती मोठ्या प्रमाणात ताण असेल? ते आपल्या मुलांना कसा वेळ देत असतील? याबाबत 'झी  24 तास'ने एक खास रिपोर्ट तयार केला आहे.

संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण, या कोरोनाशी लढणारे लढवय्ये दांपत्य म्हणजे शिरूर तालुक्यातील गणेगावचे सुपुत्र व नाशिकचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे व त्यांच्या पत्नी नाशिक महानगरपालिकेच्या उपायुक्त अर्चना तांबे. संबंधित दांपत्य नागरिकांच्या संरक्षणासाठी अहोरात्र काम करत आहे. अमोल तांबे यांच्यावर पोलिस प्रशासनाची तर अर्चना तांबे यांच्यावर नाशिक महानगर पालिकेने राबविलेल्या 18 शेल्टर होमची जबाबदारी आहे. या शेल्टर होममध्ये तब्बल 1000 बेघर मजूर आहेत. या कामावरून दोघांवर किती मोठी जबाबदारी आहे, हे पाहायला मिळते.


सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दोघेही प्रशासनामध्ये उच्च पदावर काम करत असताना घरी दोन लहान मुले आहेत. अर्चना तांबे यांचा नुकताच वाढदिवस होता. पण, त्यांना जबाबदारीमुळे वाढदिवस साजरा करणे तर दूरच पण मुलांना साधी मिठीही मारता आली नाही. तांबे दांपत्य मुलांना घरी ठेवून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी घराबाहेर पडतात. मुलांनीही आपल्या आई-बाबांची जबाबदारी ओळखली आहे. आई-बाबा दिवसभर बाहेर असल्यामुळे घरी आल्यानंतर ते सॅनिटाइझर देऊन त्यांच्यापासून काही अंतर दूर राहून नियम पाळताना दिसत आहेत.

अमोल तांबे म्हणाले, 'मिठीची किंमत आता कळते आहे. मुलं रोज विचारतात पप्पा आम्हाला आजून किती दिवस मिठी मारणार नाही. प्लाईंग किस अथवा डोळ्यांच्या माध्यमातून आम्ही प्रेम व्यक्त करत आहोत. पण, आपलेपणा, प्रेम किंचीतही कमी झालेले नाही. एकमेकांच्या काळजीमुळे प्रेम उलट जास्तच वाढले आहे.'


अर्चना तांबे म्हणाल्या, 'मुलांना समजले आहे की, आलेल्या परिस्थितीला आपण कसे सामरे गेले पाहिजे. त्यानंतर त्यांना हे सुद्धा समजले आहे की, आपणही कोरोना पासून दूर राहण्याबाबत पाळले पाहिजे. घरी आल्यानंतर ते दरवाजा उघडून सॅनिटाइझर देतात. त्यांना ही आमच्यापासून दूर ठेवावेच लागते, या जबाबदारीची जाणीव त्यांनाही झाली आहे.'

दरम्यान, कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनात कार्यरत असलेल्या तांबे कुटुंबियांवर शिरूर तालुक्याबरोबरच राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या