शिरुर तालुक्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला...

Image may contain: plant
शिक्रापूर,ता.१४ एप्रिल २०२० (प्रतिनिधी): कोरोना व्हायरसचे पुण्यात आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असताना शिरुर तालुक्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला असुन या घटनेने संपुर्ण शिरुर तालुका हादरला आहे.शिक्रापूर (ता.शिरुर) येथील एका सोनोग्राफी सेंटर मधील डॉक्‍टरला कोरोनाची लागण झालेली असून त्याचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तसेच सोनोग्राफी सेंटरमध्ये कामाला असलेल्या ८ कामगारांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.तसेच सोनोग्राफी सेंटर चालक व कोरोना बाधित डॉक्‍टरने ४ दिवसांत तब्बल १५० रुग्णांची सोनोग्राफी केलेली आहे.त्यामुळे डॉक्‍टरच्या संपर्कात आलेल्या १४४ जणांचा शोध घेण्यात येत आहे.


शिक्रापुर येथील एका सोनोग्राफी सेंटर मधील डॉक्‍टरला त्रास होऊ लागल्याने आणि त्यांना  कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी प्रथम पुणे येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले.त्यानंतर पुण्यातील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु केले उपचारा दरम्यान तेथे डॉक्‍टरच्या करोना आजारा संबंधित तपासण्या करण्यात आल्या असता कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यानंतर पुन्हा नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये देखील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शिक्रापुर परीसरासह शिरुर तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.शिक्रापूर येथे रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणापासून काही परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आलेली आहे.पुढील काही काळ देखील येथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार आहेत.पोलिसांकडून विशेष काळजी घेत या परिसरामध्ये नागरिकांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.तर गावाला जोडणारे सर्व बाजूचे रस्ते पूर्णपणे बंद करून गावच संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.


तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशिद, तळेगाव ढमढेरे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रज्ञा घोरपडे, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे, माजी सरपंच जयश्री भुजबळ यांसह आदींनी शिक्रापूर येथील सोनोग्राफी सेंटर असलेल्या ठिकाणी धाव घेत पाहणी करून परिसरात फवारणी केली. तसेच सोनोग्राफी सेंटरदेखील बंद केले आहे.

शिक्रापुरला वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट...
शिक्रापूर येथील डॉक्‍टरला करोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. ऐश्वर्या शर्मा, तहसीलदार लैला शेख, नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे, तलाठी अविनाश जाधव यांनी शिक्रापूर गावाला भेट दिली.आरोग्य विभागाला या सोनोग्राफी सेंटरमध्ये आलेल्या १४४ लोकांची नावे व पत्ते शोधून त्यांना योग्य माहिती देत, काळजी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत.

याबाबत बोलताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र शिंदे म्हणाले या डॉक्‍टरचा खासगी तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.परंतु एनआयव्हीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.खबरदारी म्हणून परिसरात फवारणी करत इतर कार्यवाही करण्याचे काम सुरु केले आहे.

याबाबत बोलताना  तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. प्रज्ञा घोरपडे म्हणाल्या शिक्रापूर येथील ३ किलोमीटरचा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून, सोनोग्राफी सेंटर सील करत त्यातील ८ कामगार तपासणीसाठी पाठविले आहे. याठिकाणी सोनोग्राफीसाठी आलेल्या १४४ नागरिकांची दररोज तपासणी करत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येईल.

याबाबत बोलताना शिक्रापुरचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार म्हणाले,करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे.परंतु नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या