काठापूरमध्ये शेतात घुसून पती-पत्नीला बेदम मारहाण

शिरुर, ता. २० एप्रिल २०२० (संपत कारकुड): काठापूर खुर्द (ता.शिरुर ) येथील सर्वेनंबर  ८ गट नं २१ या शेतातील कांदा पीक काढत असताना गावातील किसन बबन उंडे व इतर १० जणांनी जुना वाद उकरून काढून कांदा का काढता...? हे आमचे शेत आहे, असा सवाल करून शेतात घुसून सविता नरवडे पती जयसिंग नरवडे दोन मुली शुभांगी, कोमल व मुलगा रवींद्र नरवडे यांना २० ते ३० महिला-पुरुषांच्या जमावाने बेदम मारहाण करून दहशत निर्माण केल्याचा प्रकार शुक्रवार (दि १७) एप्रिल रोजी दुपारी ३:३० ते ४ दरम्यान घडला असून या घटनेला ३ दिवस उलटुन गेले असताना अद्यापही शिरुर पोलीस स्टेशनने गुन्हा नोंद केला नसल्यामुळे नरवडे कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे.


प्रत्यक्षदर्शी मारहाण झालेले पती-पत्नी व त्यांच्या मुलांनी दिलेल्या लेखी माहितीद्वारे गेली १७ वर्षांपासून नरवडे-उंडे जमीन मालकीहक्काचा वाद चालू आहे. कोर्टकचेरीद्वारे मिळालेले सर्व निकाल नरवडे यांच्या बाजूने लागलेले असून हायकोर्टातील आदेशाप्रमाणे खालील कोर्टाद्वारे दिलेले निकाल कायम करून अंतिम निर्णय घेण्यासाठी शिरुर कोर्टामध्ये पाठविण्यात आले. ५ महिन्यात निकाल द्यावा अश्या सूचना निकालपत्रात केल्या आहेत.परंतु ५ वर्ष उलटून गेले तरी अद्याप निकाल लागला नाही. याचाच परीणाम सध्या नरवडे कुटुंब भोगत असून वेळोवेळी धमकी, दहशत, मारहाणीच्या पोलीस तक्रारी करुनही काहीच कारवाई होत नाही.


मारहाण झाल्याची फिर्याद देण्यासाठी हे कुटुंब प्रथम टाकळी हाजी येथील पोलीस स्टेशनला गेले असता ते  बंद असल्यामुळे शिरुर येथे गेले. शिरुर येथील पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना घटनेची तक्रार घेणेबाबत विनंती केली असता तक्रारीसाठी ए पीआय भगवान पालवे यांच्याकडे जाण्यास सांगितले.एपीआय पालवे यांनी तुमची कोर्टात भांडण चालु असल्याचे सांगत नरवडे कुटूंबियांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.नरवडे कुटूंबियांना मारहाण झाल्याचे सरकारी दवाखान्याचे मारहाण रिपोर्ट हातात असूनहि शिरुर पोलीसने अद्याप का तक्रार नोंद का केले नाही...? यापाठीमागे नेमके काय कारण आहे...? टाकळी हाजी ते शिरुर पोलीस स्टेशन दरम्यान या कुटुंबाला हेलपाटे का मारावे लागत आहेत. हि केस नोंदवण्यास पोलीस नेमकी कोणाच्या आदेशाची वाट पाहतात, अशी असंख्य कारणे आणि संशय नरवडे कुटुंबांनी  www.shirurtaluka.com  शी बोलताना व्यक्त केला.


नरवडे कुटुंबियांना मारहाण करणारा किसन बबन उंडे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असुन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांचा कट्टर समर्थक आहे.त्यामुळे पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप जयसिंग नरवडे यांनी केला आहे.
क्रमश:

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या